पैसेवाटपाविरोधी कसब्यात परस्परविरोधी तक्रारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पैसेवाटपाविरोधी कसब्यात परस्परविरोधी तक्रारी
पैसेवाटपाविरोधी कसब्यात परस्परविरोधी तक्रारी

पैसेवाटपाविरोधी कसब्यात परस्परविरोधी तक्रारी

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : भाजपच्या कार्यकर्त्यांनी पैशाचे वाटप केल्याचा तसेच विशिष्ट समाजाच्या मतदारांना पैसे देऊन थेट बोटाला शाई लावून मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रविवारी केला. तर पैसेवाटपास विरोध केला, म्हणून महात्मा फुले पेठेतील एका कुटुंबाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. याचबरोबर भाजपनेही या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहेत.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महात्मा फुले पेठ (गंज पेठ) येथील लहुजी वस्ताद साळवे तालीम येथे पत्रकार परिषद घेत हा आरोप केला. या वेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश काकडे, माजी नगरसेवक अविनाश बागवे या वेळी उपस्थित होते.

महात्मा फुले पेठ येथे भाजपचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर व त्यांचे कुटुंबीय शनिवारी दुपारी मतदारांना पैसे वाटत होते. त्याला विशाल कांबळे व अन्य कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर शनिवारी मध्यरात्री विष्णू हरिहर तसेच निर्मल हरिहर व हिरा हरिहर यांच्यासह अन्य काही जणांनी तेथे येऊन विशाल कांबळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील महिलांसह अन्य सदस्यांना मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केली, अशी तक्रार मीठगंज पोलिस चौकीत दाखल केल्याची माहिती बागवे व जगताप यांनी दिली. दरम्यान निर्मल व हिरा हरिहर यांनीही विशाल कांबळे, निहाल कांबळे, गोविंद लोंढे, आकाश भोसले, सनी नाईक व अन्य यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

अजामीनपात्र गुन्हा असूनही पोलिसांनी हरिहर यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. रविवारी ते विविध मतदान केंद्रांवर निर्धास्तपणे फिरत होते. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली पोलिस काम करत आहेत, असा आरोप जगताप यांनी केला. तसेच लोहियानगर परिसरातील विशिष्ट समाजाच्या मतदारांना पैसे देऊन त्यांच्या बोटाला मतदानानंतर लावण्यात येणारी शाई लावण्यात आली. निवडणूक आयोगाकडील शाई भाजपच्या कार्यकर्त्यांकडे कशी आली, असा सवालही जगताप यांनी केला. तर भारतीय जनता पक्षाने पैसे वाटप करून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा आरोप जोशी व काकडे यांनी केला.