वाघोलीमध्ये रात्रभर विद्युतपुरवठा खंडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघोलीमध्ये रात्रभर विद्युतपुरवठा खंडीत
वाघोलीमध्ये रात्रभर विद्युतपुरवठा खंडीत

वाघोलीमध्ये रात्रभर विद्युतपुरवठा खंडीत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २७ : एकामागे एक तांत्रिक बिघाड होत गेल्याने तसेच महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब लोणीकंद उपकेंद्रातील आकस्मिक दुरुस्तीच्या कामामुळे वाघोलीमधील सुमारे ९ हजार ५०० वीजग्राहकांचा वीजपुरवठा रात्रभर खंडित होता. महावितरणने तातडीने दुरुस्ती काम हाती घेतल्यानंतर सोमवारी सकाळी साडेआठ वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र, नागरिकांना रात्रभर मनस्ताप सहन करावा लागला.

वाघोली परिसराला पूर्वरंग २२/२२ केव्ही उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. या उपकेंद्राला महापारेषणच्या लोणीकंद अतिउच्चदाब उपकेंद्रामधून महावितरणच्या पूर्वरंग २२ केव्ही वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. मात्र, रविवारी (दि. २६) सकाळी ११ वाजताच्या सुमारास पूर्वरंग वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे पूर्वरंग उपकेंद्राला करोल-२ या वीजवाहिनीद्वारे पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, दुपारनंतर महापारेषणच्या लोणीकंद अतिउच्चदाब उपकेंद्रामध्ये आकस्मिक दुरूस्तीचे काम उद्भवले. ते करणे अत्यंत गरजेचे असल्याने सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत या अतिउच्चदाब उपकेंद्रातून निघणाऱ्या महावितरणच्या वाघेश्वर, संघार व करोला-२ या तिनही २२ केव्ही वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर महावितरणच्या तीनही वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र अर्ध्या तासात वाघेश्वर व करोला-२ या वाहिन्यांमध्ये बिघाड होऊन वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला.

दरम्यान महापारेषणच्या आकस्मिक दुरुस्ती कामामुळे सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत वाघोली परिसरातील कमीत कमी ग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यासाठी महावितरणकडून पर्यायी वीजपुरवठ्यासाठी तांत्रिक उपाययोजना करण्यात आली. यामध्ये वाघोली २२ केव्ही वाहिनीवर आकस्मिक दुरुस्ती कामामुळे बंद असलेल्या वीजवाहिन्यांचा भार टाकण्यात आला. परिणामी, नाईलाजास्तव वाघोली परिसरातील आव्हाळवाडी रोड, साईसत्यम पार्क, रेणुका पार्क, दाभाडे वस्ती, बायफ रस्ता, डोमखेल वस्ती या परिसरातील सुमारे ९ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा महापारेषणच्या आकस्मिक दुरुस्ती कामामुळे सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला. त्यानंतर महावितरणच्या वाघेश्वर व करोला-२ या वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे तसेच विजेचे भारव्यवस्थापन शक्य नसल्यामुळे या परिसरात रात्री ८.३० वाजेपासून वीजपुरवठा पुन्हा बंद झाला.

रात्रभर दुरुस्तीचे काम
महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी रात्रभर वाघेश्वर व करोला-२ या दोन्ही भूमिगत वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केले. जेसीबी व ब्रेकरने खोदकाम करण्यात आले. यामध्ये वाघेश्वर २२ केव्ही वाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सकाळी ८.३० वाजता सर्वच ९ हजार ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.