‘आरपीएफ’ला पहिल्यादांच दंगा नियंत्रण प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आरपीएफ’ला पहिल्यादांच दंगा नियंत्रण प्रशिक्षण
‘आरपीएफ’ला पहिल्यादांच दंगा नियंत्रण प्रशिक्षण

‘आरपीएफ’ला पहिल्यादांच दंगा नियंत्रण प्रशिक्षण

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांना पहिल्यादांच दंगेखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते आहे. देशभरातील सुमारे ८० हजार हून अधिक जवानांना हे प्रशिक्षण दिले जाणार असून यात पुणे विभागातील जवानांचाही समावेश आहे. आतापर्यंत पुणे विभागाच्या सुमारे २०० जवानांना हे प्रशिक्षण देण्यात आले. दंगेखोरावर नियंत्रण आणून रेल्वे गाडयाचे व मालमत्तेचे रक्षण करणे हा याचा प्रमुख हेतू आहे. मागच्या वर्षी ‘अग्नीवीरां’च्या भरतीवेळी बिहार राज्यात रेल्वे डब्यांना आग लावण्याचे प्रकार घडले होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आरपीएफ जवानांचे रेल्वे मालमत्तेचे नुकसान होऊ नये, ही प्रमुख जवाबदारी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत विविध सामाजिक प्रश्नांवर देशातील काही भागात रेल्वे गाड्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्तीचेही नुकसान झाले. भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालय पहिल्यादांच ‘आरपीएफ’ जवानांना प्रशिक्षण देत आहे. आठ दिवसांच्या प्रशिक्षणात दंगेखोरांविरोधात लढताना काय करावे, जमावावर नियंत्रण कसे आणावे, याचे प्रशिक्षण दिले जात आहे.

प्रशिक्षण कशासाठी?
रेल्वे मंत्रालय देशातील सर्व रेल्वे विभागातील आरपीएफ जवानांना याचे प्रशिक्षण देणार आहे. पुणे विभागात एकूण ४५० सैनिक असून पैकी २०० जणांचे प्रशिक्षण पूर्ण देखील झाले आहे. हे प्रशिक्षण प्रत्येक झोनच्या प्रशिक्षण केंद्रावर दिले जाते. मध्य रेल्वेचे प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे असून येथे पुणे, सोलापूर, मुंबई, नागपूर व भुसावळ विभागातील जवानांना प्रशिक्षण दिले जात आहे. आठ दिवसांच्या प्रशिक्षणात दगडफेकीत स्वतःचे रक्षण करीत दंगेखोरांना हुसकावून लावणे, रेल्वे रुळावर बसलेल्या आंदोलनकर्त्यांना हुसकावणे, अश्रुधुराचा वापर करणे, आगीच्या घटनेवेळी अग्निशमन दलाच्या जवानांना मदत करणे आदी प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे आरपीएफला एखाद्या आंदोलन प्रसंगी दुसऱ्या फोर्सची वाट पाहत बसावे लागणार नाही. ते स्वतः जमावावर नियंत्रणासाठी पाऊल उचलू शकतील.

दंगेखोरांवर नियंत्रण कसे मिळवावे, त्यांना कसे तोंड द्यावे यासाठीचे विशेष प्रशिक्षण सुरू आहे. पुणे विभागाच्या आतापर्यंत २०० जवानांचे प्रशिक्षण पूर्णदेखील झाले आहे. उर्वरित जवानचेदेखील प्रशिक्षण लवकर पूर्ण होईल.
- उदयसिंह पवार, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, पुणे