दुपारी बारा वाजता स्पष्ट होणार कल पोटनिवडणूक : कसब्याचा निकाल दुपारी चारला तर चिंचवडचा रात्री दहाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुपारी बारा वाजता स्पष्ट होणार कल
पोटनिवडणूक : कसब्याचा निकाल दुपारी चारला तर चिंचवडचा रात्री दहाला
दुपारी बारा वाजता स्पष्ट होणार कल पोटनिवडणूक : कसब्याचा निकाल दुपारी चारला तर चिंचवडचा रात्री दहाला

दुपारी बारा वाजता स्पष्ट होणार कल पोटनिवडणूक : कसब्याचा निकाल दुपारी चारला तर चिंचवडचा रात्री दहाला

sakal_logo
By

पुणे, ता. १ : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या, अत्यंत चुरशीच्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कोण जिंकणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. गुरुवारी (ता. २) या दोन्ही ठिकाणी मतमोजणी होणार असून, यात भाजप महायुती जिंकणार की महाविकास आघाडीच्या एकीचा विजय होणार हे स्पष्ट होणार आहे. तथापि, कसब्याचा अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी चार वाजणार आहेत. तर चिंचवड मतदारसंघ मोठा असल्याने त्याचा निकाल जाहीर होण्यासाठी साधारण रात्रीचे दहा वाजतील.

कसबा विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे हेमंत रासने विरुद्ध आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत आहे. तर, चिंचवड मतदारसंघात भाजपच महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल (नाना) काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी निवडणूक होत आहे. कसब्याची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात होणार आहे. तर चिंचवडची मतमोजणी थेरगाव येथील शंकरअण्णा गावडे कामगार भवन येथे सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाची सर्व तयारी झाली असून, सकाळी साडेदहा, ११ नंतर कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पण मतमोजणीची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन, तपासणी करून, व्हीव्हीपॅटची मोजणी करून अंतिम निकाल जाहीर होण्यास उशीर लागणार आहे.

कसबा मतदारसंघात ५०.०९ टक्के मतदान झाले आहे. पोटनिवडणुकीत ५० टक्के मतदान झाल्याने त्याचा नेमका फायदा रासने यांना होणार की धंगेकर यांना याकडे लक्ष लागले आहे. प्रचारादरम्यान झालेले राजकीय आरोप-प्रत्यारोपासह पैसेवाटप, त्यावरून झालेले आरोप, दाखल झालेले गुन्हे यामुळे ही निवडणूक गाजली आहे. भाजप आणि काँग्रेसला मानणाऱ्या भागात चांगले मतदान झाल्याने ही निवडणूक चुरशीची झालेली आहे. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी निकालाआधीच आमदार झाल्याचे फ्लेक्स लावल्याने त्याची चर्चा रंगली आहे. ही उत्कंठा वाढलेली असताना उद्या कसब्याचा नवा आमदार म्हणून रासने की धंगेकर विराजमान होणार हे स्पष्ट होईल. कसब्याची मतमोजणी २० फेऱ्यांमध्ये होणार आहे.

चिंचवडमधील मतदारांची संख्या कसब्यापेक्षा दुप्पटीने जास्त आहे. तेथे ५०.४७ टक्के मतदान झाले आहे. त्याठिकाणी एकूण ३७ फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. चिंचवडमध्ये जगताप, काटे आणि कलाटे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. प्रत्येक उमेदवाराने निवडणुकीत ताकद पणाला लावली आहे. यातून जनतेचा कौल कोणाला आहे हे स्पष्ट होणार आहे.