‘पहिला पेपर चांगला गेला’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पहिला पेपर चांगला गेला’
‘पहिला पेपर चांगला गेला’

‘पहिला पेपर चांगला गेला’

sakal_logo
By

पुणे, ता. २ : विद्यार्थ्यांचे औक्षण करून परीक्षा केंद्रावर करण्यात आलेले स्वागत आणि भरभरून दिलेल्या शुभेच्छा, परीक्षा केंद्रात प्रवेश करताना विद्यार्थ्यांची करण्यात येणारी तपासणी आणि त्यासाठी लागलेल्या रांगा, अगदी परीक्षा सुरू होईपर्यंत अभ्यासाची विद्यार्थ्यांकडून करण्यात येणारी उजळणी, अखेर वर्षभराच्या अथक अभ्यासानंतर प्रत्यक्ष पेपर लिहिण्यास केलेली सुरवात, शेवटच्या घंटेपर्यंत सुरू असलेले लिखाण, पोलिसांचा कडक बंदोबस्त, अशा वातावरणात दहावीची बोर्डाची परीक्षा गुरुवारी सुरू झाली. ‘पहिला पेपर चांगला गेला’, असा अनुभव विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा गुरुवारपासून सुरू झाली. या परीक्षेसाठी राज्यभरातील २३ हजार १० शाळांमधून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर पुणे विभागीय मंडळातून दोन लाख ६८ हजार २०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीच्या परीक्षेतील पहिला पेपर हा मराठी विषयाचा होता. सकाळी नऊ, साडे नऊ वाजल्यापासूनच परीक्षा केंद्रावर विद्यार्थी पालकांसमवेत हजर झाले. शहरातील काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. परीक्षा केंद्रावर पोचल्यावर विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी रांगा लागल्या होत्या. तपासणी झाल्यानंतर त्यांना आत प्रवेश देण्यात आला. दरम्यान, परीक्षा केंद्राबाहेर अनेक पालक हे मुलांचा पेपर संपेपर्यंत थांबल्याचे दिसून आले. तर प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त विद्यार्थ्यांनी पहिला पेपर दिला.
शहराच्या मध्यवर्ती भागात राहणाऱ्या, किंवा त्याठिकाणी परीक्षा केंद्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा संपल्यानंतर घरी पोचायला मात्र काहीसा उशिरा झाला. कारण, कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी अखेरच्या टप्प्यात होती आणि विजयी उमेदवारांची जल्लोष गल्लोगल्ली सुरू होता. त्यामुळे दुपारी पेपर संपल्यानंतर पालकांसमवेत विद्यार्थ्यांना घरी पोचण्यास काहीसा वेळ लागला.