
काँग्रेस भवनात तेरा वर्षांनंतर उधळला गुलाल!
पुणे, ता. २ : काँग्रेस भवन. लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्फूर्तिस्थान. २००९ पूर्वी याच काँग्रेस भवनाच्या परिसरात प्रत्येक निवडणुकीत विजयाचा गुलाल मुक्तपणे उधळला जात होता. त्यानंतर मात्र काँग्रेस भवन परिसरात गुलाल उधळण्याची संधीच कार्यकर्त्यांना मिळाली नाही. आता एक, दोन नव्हे तर तब्बल १३ वर्षांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पुण्यात विधानसभा निवडणुकीत विजय झाला आणि काँग्रेस भवनाच्या त्याच आवारात कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा गुलाल अंगावर घेण्याची सुवर्णसंधी मिळाली!
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या काँग्रेस भवनाला उमेदवारांचे विजय, त्यामुळे साजरा केला जाणारा जल्लोष कधीच नवीन नव्हता. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे रमेश बागवे हे पर्वती मतदारसंघातून विजयी झाले. त्याचबरोबर शिवाजीनगर मतदारसंघातून विनायक निम्हण हेदेखील विजयी झाले. दोघांच्या विजयाचा जल्लोष काँग्रेस भवनामध्ये साजरा झाला. गुलालाची मुक्तहस्ते उधळणही करण्यात आली. त्यानंतर झालेल्या २०१४, २०१९ या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये शहरातील काँग्रेसचे उमेदवार निवडून आले नाहीत.
महापालिकेच्या २००७, २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकीत पक्षाची सदस्यसंख्या कमी होत गेली. अखेर रवींद्र धंगेकर यांच्या रूपात कार्यकर्त्यांना अंगावर गुलाल उधळण्याची संधी गुरुवारी मिळाली.