कल्पना बळीवंत यांच्याकडे आरोग्यप्रमुख पदाचा कार्यभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्पना बळीवंत यांच्याकडे 
आरोग्यप्रमुख पदाचा कार्यभार
कल्पना बळीवंत यांच्याकडे आरोग्यप्रमुख पदाचा कार्यभार

कल्पना बळीवंत यांच्याकडे आरोग्यप्रमुख पदाचा कार्यभार

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख पदाचा कार्यभार विभागातील उपआरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांच्याकडे देण्यात आला आहे. महापालिकेत प्रतिनियुक्तीवर असलेल्या डॉ. आशिष भारती यांची बदली पुन्हा सार्वजनिक आरोग्य खात्याच्या उपसंचालकपदी केल्याने हे पद रिक्त झाले होते.
कोरोना उद्रेकादरम्यान महापालिकेच्या आरोग्य विभाग प्रमुखपदी राज्य सरकारने डॉ. भारती यांची नियुक्ती केली. त्यांना ३० सप्टेंबर २०२० रोजी एका वर्षासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख पदावर प्रतिनियुक्तीचे आदेश दिले. त्यांचा हा कालावधी संपल्यानंतर ५ ऑक्टोबर २०२१ ते ४ ऑक्टोबर २०२२ या दरम्यान पुन्हा एका वर्षासाठी मुदतवाढ दिली होती. त्यानंतर भारती यांना मुदतवाढ दिल्याचे पत्र आलेले नव्हते. त्या पार्श्वभूमिवर डॉ. भारती यांच्या बदलीचे आदेश आले. त्यामुळे रिक्त झालेल्या आरोग्य प्रमुख पदाचा कार्यभार महापालिकेच्या आरोग्य विभागातील उपप्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. बळीवंत यांना पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील वेगवेगळ्या पदांवर कामाचा अनुभव आहे. त्या १९९८ मध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या.
महापालिकेतील आरोग्य विभाग प्रमुख पदावर परत राज्याच्या आरोग्य खात्यातून कोणी अधिकारी प्रतिनियुक्तीवर येणार की, विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पूर्णवेळ या पदाचा कार्यभार सोपविला जाणार, या बाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत. या निवडीसाठी जाहिरात देऊन अर्ज मागविण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतरच निवडलेल्या अधिकाऱ्याकडे पदाचा कार्यभार सोपविण्यात येईल. तोपर्यंत डॉ. बळीवंत यांच्याकडे या पदाची सूत्रे राहणार आहेत.