
चौदा उमेदवारांची अनामत रक्कम जप्त
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३ : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने वगळता उर्वरित चौदाही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. या उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यात येत असल्याची नोटीस पाठविण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी सांगितले.
कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी, भाजपच्या या प्रमुख पक्षासह १६ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीची मतमोजणी रविवारी होऊन त्यांचा निकाला लागला. या मतदार संघात दोन लाख ७५ हजार ७१७ मतदार आहेत. त्यापैकी एक लाख ३६ हजार ९८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी ५१.६ टक्के मतदान झाले होते. त्यापैकी धंगेकर यांना ७३ हजार ३०९, तर रासने यांना ६२ हजार ३९४ मते मिळाली. काँग्रेस, भाजप व्यतिरिक्त सैनिक समाज पक्षाचे तुकाराम डाफळ यांना १५३, प्रभुद्ध रिपब्लिक पार्टीचे बलजितसिंग कोच्चर यांना ५१, राष्ट्रीय मराठा पक्षाचे रवींद्र वेदपाठक यांना ४१ मते मिळाली. याशिवाय ११ अपक्षांना मिळून १०३२ मते मिळाली. २२ मते बाद ठरली, तर २७ बनावट मतदान झाले, अशी माहिती कसबा निवडणूक निर्णय अधिकारी-किसवे-देवकाते यांनी दिली.
काय आहेत नियम?
नोटा पर्याय वगळता झालेल्या मतदानापैकी रिंगणात असलेल्या उमेदवारांना १६ टक्के मते मिळविणे आवश्यक होते. तो आकडा कसब्यात २२ हजार ८०० एवढा होता. म्हणजेच अनामत रक्कम वाचविण्यासाठी एवढी मते मिळविणे आवश्यक होते. मात्र, धंगेकर आणि रासने वगळता उर्वरित १४ उमेदवारांना अनामत रक्कम वाजविण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे या १४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात येत असल्याची नोटीस पाठविण्याचे काम शुक्रवारी सुरू करण्यात आले, असेही त्या म्हणाल्या.
अनामत रक्कम किती?
अनामत रक्कम प्रत्येक निवडणुकीसाठी वेगवेगळी असते. लोकसभा निवडणुकीसाठी अनामत रक्कम खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला २५ हजार, तर अनुसूचित जाती-जमाती उमेदवाराला १२ हजार ५०० रुपये रक्कम भरावी लागते. विधानसभा निवडणुकीसाठी खुला प्रवर्ग दहा हजार रुपये, तर अनुसूचित जाती-जमाती उमेदवारासाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते. जिंकणाऱ्या उमेदवाराला त्याची अनामत रक्कम परत दिली जाते. तसेच मतदान सुरू होण्यापूर्वी जर कोणत्याही उमेदवाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाइकांना अनामत रक्कम परत केली जाते.