तांत्रिक अडचणींचा ‘प्रवेश’!

तांत्रिक अडचणींचा ‘प्रवेश’!

पुणे, ता. ५ : ‘‘मुलीला खासगी शाळेत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश मिळावा, म्हणून संबंधित पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु संकेतस्थळ खूप संथगतीने चालत असल्याने अर्ज भरणे शक्य होत नाहीये,’’ खासगी कंपनीत नोकरी करणारे दीपक चव्हाण (नाव बदललेले आहे) सांगत होते. तर दुसरीकडे, साधना कदम (नाव बदललेले आहे) या देखील आपल्या मुलीला चांगल्या शाळेत शिकता यावे म्हणून आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या पोर्टल ऑनलाइन अर्ज भरण्याचा प्रयत्न गेल्या तीन-चार दिवसांपासून करत आहेत. परंतु संबंधित पोर्टलवर नवीन नोंदणी आणि ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर तो ‘सबमिट’ होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवरील प्रवेशाकरिता प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये या अंतर्गत प्रवेशासाठी एक मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत राज्यातील आठ हजार ८२८ शाळांमधील एक लाख एक हजार ९६९ जागांसाठी ९४ हजार ३२२ अर्ज आले आहेत. तर पुणे जिल्ह्यातील ९३६ शाळांमधील १५ हजार ६५५ जागांसाठी सहा दिवसांत २० हजार ३६२ अर्ज आले आहेत. दरम्यान, पालकांना अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे.

आतापर्यंत आलेले अर्ज
जिल्हा : आरटीई शाळा : रिक्त जागा : आतापर्यंत आलेले अर्ज
पुणे : ९३६ : १५,६५५ : २०,३६२
नगर : ३६४ : २,८२५ : २,३८५
औरंगाबाद : ५४७ : ४,०७३ : ४,९२८
नागपूर : ६५३ : ६,५७७ : ११,९६६
नाशिक : ४०१ : ४,८५४ : ५,६५४
ठाणे : ६२९ : १२,२७८ : ८,५३०

पालकांना येणाऱ्या अडचणी
- ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर यंत्रणा ‘हॅंग’ झाल्याने अर्ज ‘सबमिट’ न होणे
- अर्ज भरत असतानाच मध्येच तांत्रिक अडचणी येणे
- पोर्टलवर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करताना यंत्रणा संथ गतीने चालणे

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दिलेल्या पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत होत्या. सर्व्हर संथगतीने सुरू होते, त्यामुळे पालकांना अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र आता प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी ‘https://rte25admission.maharashtra.gov.in/Users/rteindex’ ही नवीन लिंक शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. पालकांना आधीच्या आणि नव्याने दिलेल्या अशा दोन्ही लिंकवर अर्ज करता येणार आहे.
- शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण विभाग

गेल्या दोन दिवसांपासून आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी असलेल्या पोर्टलवर मुलीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु संकेतस्थळावर अर्ज भरल्यानंतर, अर्ज ‘सबमिट’ करण्याची आणि त्यापुढील कोणतीही प्रक्रिया होत नसल्याचे दिसून येत आहे.
- शुभांगी नवले, पालक

---------------------------
प्रक्रिया लवकर व्हावी म्हणून बऱ्याच वेळा ऑनलाइन प्रणालीचा वापर केला जातो. पण त्यातील तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रिया लवकर होण्याचे सोडून मनस्तापच सहन करावा लागतो. ‘आरटीई’ म्हणजे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के राखीव जागांबाबत असंच झालं आहे. पालकांनो, आपले अनुभव किंवा सूचना सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून किंवा आपल्या नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com