
सांस्कृतिक राजधानीत पार्किंगसाठी तारेवरची कसरत
पुणे, ता. ५ ः राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन येणाऱ्या एसटी बसला पार्किंगच्या असुविधेचा फटका बसत आहे. विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या या एसटी बस शनिवारवाड्याभोवती उभ्या केल्यास वाहतूक कोंडी होत असून एसटी चालकांवर वाहतूक पोलिसांच्या कारवाईची टांगती तलवार असते.
पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातून हजारो विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन एसटीच्या बस पुण्यात पर्यटनासाठी येत असतात. विद्यार्थ्यांना शनिवारवाडा, लाल महाल, राजा दिनकर केळकर संग्रहालय यासह मध्यवर्ती भागातील धार्मिक स्थळे, तुळशीबाग, रविवार पेठ, लक्ष्मी रस्ता पाहण्याची उत्सुकता असते. त्यादृष्टीने एसटी चालक विद्यार्थ्यांना शनिवारवाड्याजवळ विद्यार्थ्यांना पर्यटनासाठी सोडतात. मात्र, यानंतर एसटी बस चालकांना बस पार्किंग करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा या बस शनिवारवाड्याजवळ उभ्या केल्या जातात. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांनाही नाहक कोंडीत अडकावे लागते.
नदीपात्रात पार्किंग अडचणीची
- वाहतूक पोलिसांकडून बस नदीपात्रात पार्किंग करण्यास सांगितले जाते
- नदीपात्रात जाण्याचा रस्ता अरुंद असल्याने एसटीच्या मागे वाहनांच्या रांगा
- चालकांना वाहतूक कोंडीतून बस बाहेर काढणे अडचणीचे
पार्किंगच्या गैरसोयीचा फटका
अनेकदा सहलीच्या एसटी अन्य ठिकाणी पार्किंग करण्यास पोलिसांकडून सांगितले जाते. मात्र, विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही पुणे शहर नवीन असल्याने पुन्हा बसपर्यंत पोहोचणे अडचणीचे ठरते. अनेकदा लहान विद्यार्थी, विशेष मुलांना दूर अंतरावरील बसपर्यंत जाता येत नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थी किंवा शिक्षकांना पार्किंग केलेल्या बसमध्येच बसण्याशिवाय पर्याय उरत नाही.
आम्ही बाहेरून येतो, त्यामुळे आम्हाला इथले रस्ते किंवा पार्किंगची माहिती नसते. आमच्या काही एसटी चालकांना यापूर्वी वाहतूक पोलिसांचा दंडही भरावा लागला आहे. हे पैसे आमच्या खिशातून जातात. त्यामुळे महापालिका, पोलिस प्रशासनाने एसटी बसला पार्किंगसाठी जवळ सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- वैभव शिंदे, चालक, एसटी
शनिवारी, रविवारी सहलीसाठी येणाऱ्या एसटी अधिक असतात. शनिवारवाड्याभोवती ‘नो पार्किंग’ असतानाही या बस तेथेच उभ्या केल्या जातात. बसमध्ये विद्यार्थी असल्याने संबंधित एसटी चालकांवर दंडात्मक कारवाई टाळून त्यांना अन्यत्र बस पार्किंग करण्याच्या सूचना आम्ही देतो. सांगूनही दुर्लक्ष केले, तरच कारवाई होते. मात्र, सहलीसाठी येणाऱ्या एसटी बससाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे.
- पुरुषोत्तम देवकर, सहायक पोलिस निरीक्षक, विश्रामबाग वाहतूक शाखा
शनिवारवाडा परिसरात पार्किंगची अडचण आहे. नदीपात्रात सुविधा दिल्यास ते लांब पडेल. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा मुद्दा संवेदनशील आहे. त्यामुळे सहलीच्या एसटी बस पार्किंगसाठी आम्ही नक्कीच चांगले पर्याय शोधू. त्यासाठी एसटी महामंडळ, वाहतूक पोलिस अधिकारी यांच्याशीही चर्चा करू.
- कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
फोटो नं - २८७६६,२८७६७