
पुणे व परिसरात पावसाची शक्यता
पुणे, ता. ५ ः पुणे शहर आणि परिसरात तुरळक भागात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
शहरात रविवारी (ता. ५) ३५.२ अंश सेल्सिअस कमाल आणि १५.९ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. सध्या पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाल्याने शहर आणि परिसरात सोमवार (ता. ६) आणि मंगळवारी (ता. ७) दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तसेच जिल्ह्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचे वारे वाहतील व पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान शुक्रवारपासून (ता. १०) शहर व परिसरात पुन्हा निरभ्र वातावरणाची शक्यता आहे.
रविवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात ही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. धुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची नोंद झाली. तर सोमवारी (ता. ६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. रविवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सांताक्रूझ येथे ३८.१ अंश सेल्सिअस इतकी झाली. राज्यातील बऱ्याची ठिकाणी किमान तापमानात ही सरासरीपेक्षा वाढ झाली आहे. तर बहुतांश भागात कमाल तापमान हे सध्या ३५ अंशांवर कायम आहे. सध्या दक्षिण कोकणापासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून उत्तर गुजरात आणि नैर्ऋत्य राजस्थान परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. परिणामी राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे.
येथे पावसाचा येलो अलर्ट
पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद, बीड, जालना, अकोला, नागपूर, बुलडाणा, अमरावती,
गोंदिया, भंडारा.