
माजी नगरसेवकाच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी
पुणे, ता. ७ : मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या मुलाला अज्ञात व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच खंडणी न दिल्यास बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवू, असा संदेश त्याच्या मोबाईलवर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रूपेश वसंत मोरे (वय २१, रा. कात्रज गावठाण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश मोरे याच्या मोबाईलवर ७ फेब्रुवारीला अज्ञात व्यक्तीने औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव ग्रामपंचायतीचे बनावट विवाहनोंदणी प्रमाणपत्र पाठविले. तसेच ‘२० लाख रुपये न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करू,’ असा धमकीचा संदेश पाठविला. परंतु बनावट संदेश असावा, असे समजून रूपेश याने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु २७ फेब्रुवारीला व्हॉट्सॲपवर ‘मी अल्फिया असून, तू ३० लाख रुपये न दिल्यास विवाहनोंदणी प्रमाणपत्र व्हायरल करेन’, असा मेसेज केला. त्यानंतर पुन्हा पाच मार्चला व्हॉट्सॲपवर ‘गोळ्या घालून मारू,’ अशी धमकी दिली.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय पुराणिक यांनी सांगितले की आरोपींनी व्हॉट्सॲपवर संदेश पाठवून आणि एकदा फोन करून ही धमकी दिली. याबाबत फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी विवाहाचे बनावट नोंदणी प्रमाणपत्र तयार केले आहे. जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आमचा कायदा व सुव्यवस्थेवर विश्वास आहे. जाणीवपूर्वक कोणी खोडसाळपणा करत असल्यास पोलिस कारवाई करतील.
- वसंत मोरे, माजी नगरसेवक, मनसे