
प्रेमसंबंधात अडसर ठरल्याने मुलीचा खून
पुणे, ता. ७ : खडकीतील दोन वर्षांच्या बालिकेच्या खूनाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. प्रेमसंबंधात अडसर ठरल्याने एका जोडप्याने या मुलीचा गळा दाबून खून केला. पोलिसांनी या जोडप्याला अटक केली आहे. संतोष जामनिक (वय २५) आणि एक महिला (वय २६, दोघे रा. पिंपळे गुरव, मूळ जि. अकोला) अशी आरोपींची नावे आहेत.
खडकीतील सीएफडी मैदानावर २ मार्च रोजी एका बालिकेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेने तीन स्वतंत्र पथके तयार करून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. युनिट चारच्या पथकाने सीसीटीव्ही दृश्यांच्या आधारे तपास सुरू केला. या दृश्यांमध्ये एक जोडपे मुलीला कडेवर घेऊन खडकी बाजाराच्या दिशेने जाताना दिसले. या जोडप्याने मुलीला घटनास्थळी टाकून पोबारा केला होता.
तपासादरम्यान, या जोडप्यातील एकजण अकोल्याचे असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे गुन्हे शाखेने अकोला पोलिसांशी संपर्क साधला. त्यावेळी या जोडप्यामध्ये प्रेमसंबंध असून, ते दोन वर्षांच्या मुलीला घेऊन पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पिंपळे गुरव परिसरात या जोडप्याचा शोध घेतला. त्यावेळी आरोपी दापोडी येथील एका बांधकाम साइटवर मजुरीचे काम करीत असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे युनिट चारच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक जयदीप पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पहिल्या पतीपासून तीन मुले
आरोपी महिलेचे यापूर्वी एका व्यक्तीसोबत लग्न झाले आहे. पहिल्या पतीपासून तिला तीन मुले असून, ती त्यांच्यापासून वेगळी राहत होती. ही तीन मुले तिच्या पहिल्या पतीसोबत राहत आहेत. दरम्यान, या महिलेचे आरोपी संतोष याच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले, परंतु या प्रेमसंबंधातून झालेली ही मुलगी अडसर ठरत असल्यामुळे तिचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. आरोपींना खडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
्