ससून रुग्णालयात ‘ब्रेस्ट क्लिनिक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ससून रुग्णालयात ‘ब्रेस्ट क्लिनिक’
ससून रुग्णालयात ‘ब्रेस्ट क्लिनिक’

ससून रुग्णालयात ‘ब्रेस्ट क्लिनिक’

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : ससून रुग्णालयात ‘ब्रेस्ट क्लिनिक’ची सुरवात बुधवारपासून करण्यात आली. तसेच, स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान आणि त्यावर प्रभावी उपचारासाठी ससून रुग्णालयातर्फे स्वतंत्र ‘मोबाईल युनिट’ स्थापन करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत या कर्करोगाबद्दल जनजागृती, प्रशिक्षण आणि तपासणी करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागातर्फे ‘स्तन कर्करोग : जनजागृती व उपचार मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत ससून रुग्णालयात ‘ब्रेस्ट क्लिनिक’ सुरू करण्यात आले. त्यानिमित्ताने स्तनाच्या कर्करोग तपासणीसाठी ‘मोबाईल युनिट’ स्थापन करणार असल्याची माहिती रुग्णालयातर्फे बुधवारी दिली.
ससून रुग्णालयात दर बुधवारी दुपारी १२ ते दोन या वेळेत ‘ब्रेस्ट क्लिनिक’ची सेवा बाह्य रुग्ण विभागात रुग्णांना मिळेल. या सेवेचे उद्‍घाटन बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. भारती दासवाणी, स्तनाच्या कर्करोगतज्ज्ञ डॉ. मयूरी कांबळे, डॉ. अनंत बीडकर, डॉ. सचिन बळवंतकर, डॉ. किरण जाधव आदी उपस्थित होते. या निमित्ताने टाटा मेमोरिअल हॉस्पिटलतर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
ससून रुग्णालयातर्फे या मोहिमेअंतर्गत मोबाईल युनिटची स्थापना करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून स्तनाच्या कर्करोगाची संदर्भ सेवाही देण्यात येणार आहे. विविध महाविद्यालये, सार्वजनिक संस्था, कार्यालये, सार्वजनिक ठिकाणांवर या प्रकारच्या कर्करोगाबाबत जनजागृती मोहीम राबविल्या जातील. स्तनाच्या कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान होण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरे घेण्यात येतील.

स्तनाच्या कर्करोग क्लिनिकमुळे या आजाराचे लवकर निदान होण्यास मदत होईल. त्यामुळे रुग्णावर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. आधुनिक उपचाराचा फायदा येथील रुग्णांना मिळेल.
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

या मोहिमेतून ग्रामीण भागातील गरजू व गरीब रुग्णास वेळेत प्रभावी उपचार मिळतील. त्यामुळे या कर्करोगाचा संभाव्य धोका वेळीच टाळता येईल.
- डॉ. मयूरी कांबळे, स्तन कर्करोगतज्ज्ञ