
‘पीएमपी’ महिला कर्मचाऱ्यांनी अनुभवला आनंदाचा सोहळा
पुणे, ता. ८ ः पीएमपीएमएलच्यावतीने बुधवारी (ता. ८) जागतिक महिला दिनानिमित्त गंज पेठ येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यात महिला कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभागी होत, हा आनंदाचा सोहळा साजरा केला.
महिलांनी आज थोडा मोकळा श्वास घेतला. नेहमीच्या कामातून थोडी उसंत घेऊन आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. कुणी रांगोळीतून आपले भावविश्व साकारले तर कुणी एकांकिकातून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. नेहमीच घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या महिलांचे पायांनी फेर धरला अन् काहीचे पाय लावणीवर थिरकले. निमित्त होते, जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे.
यावेळी व्यासपीठावर पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पोतदार-पवार, कंपनी सेक्रेटरी नीता भरमकर, डॉ. ज्योती हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्या महिला कर्मचाऱ्यांनी कठीण परिस्थितीत आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन घडविले आहे, अशा १६ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ‘विश्वयोद्धा’ हे कंत्राटदार असून त्यांनी स्थापन केलेल्या महिला बचत गटातील सात महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांनी दांडिया, नृत्य, चारोळ्या, मंगळागौर, गवळण, एकांकिका, आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी सुमारे पाचशे महिला उपस्थित होते.