
काय बाई बोलणं नको खाण-पिणं!
‘‘अहो आज आपण बाहेर फिरायला जायचं का?’’ दीप्तीने सुनीलला विचारले.
‘‘चालेल की. रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली म्हणून आपण सोसायटीच्या आवारात फिरतो. आज सोसायटीच्या बाहेर फिरायला जाऊ.’’ सुनीलने म्हटले.
‘‘अहो तसं नाही. बाहेर म्हणजे फार दूर. लग्नाआधी आपण जसे चोरून फिरायला जायचो ना. अगदी तसं.’’ सुनीलने विचारले.
‘‘तसं अजिबात नको. तुझ्या भावाने पाहिलं तर माझी पाठ शेकून निघेल. मागे एकदा मला किती मार पडला होतास हे आठवतंय ना?’’ सुनीलने म्हटले.
‘‘अहो, आता तो कशाला मारेल? आपल्या लग्नाला आता पाच वर्षे झाली आहेत.’’ दीप्तीने म्हटले. त्यानंतर बऱ्याच प्रयत्नानंतर सुनील राजी झाला.
सारसबागेत भटकंती केल्यानंतर डेक्कनला जेवायला जायचं, असं दोघांनी ठरवलं. त्यानुसार ते तिकडे जाऊ लागले. तेवढ्यात टिळक रस्त्यावरील ‘ए- वन सामोसा सेंटर’ दीप्तीला दिसले.
‘‘अहो थांबा. थांबा...आपण लग्नाआधी येथे किती सामोसे खायचो. आजही आपण तिथलाच सामोसा खाऊ.’’ दीप्तीने म्हटले. सामोशांचे नाव ऐकून सुनीलच्या तोंडाला पाणी सुटले. दोघेही सामोसा सेंटरजवळ गेले.
‘‘अहो मला सामोसा खायची फार इच्छा आहे पण सध्या मी डायटवर आहे. काय करू?’’ दीप्तीने विचारले.
‘‘अगं मग नको खाऊस.’’ सुनीलने म्हटले.
‘‘पण कितीतरी वर्षांनी आपण बाहेर पडलोय, एखाद्या दिवशी खाल्ला सामोसा तर काय बिघडतंय का?’’ दीप्तीने विचारले.
‘‘अगं मग खा.’’ सुनीलने म्हटले.
‘‘सामोसे वगैरे बाहेरचे सटरफटर खाल्ल्यानंतर मी गलेलठ्ठ व्हावे, अशी तुमची इच्छा दिसतेय. त्यानंतर मला सोडचिठ्ठी देऊन, नवीन संसार थाटायचा तुमचा विचार दिसतोय.’’ दीप्तीने रागाने म्हटले.
‘‘अगं मग नको खाऊस.’’ सुनीलने म्हटले.
‘‘हे बरंय. प्रत्येकवेळी मी माझं मन का मारायचं. तुम्ही हवं ते खाणार आणि मी मात्र माझ्या आशा-अपेक्षा-इच्छा सगळं गुंडाळून ठेवायचं. हा माझ्यावर अन्याय आहे.’’ दीप्तीने म्हटले.
‘‘अगं मग खा की.’’ सुनीलने म्हटले.
‘‘तुम्हाला खा म्हणायला काय जातंय? सामोसे खाल्यानंतर माझी तब्येत बिघडणार. मग असली आजारी बायको नको म्हणून तुम्ही दुसरं लग्न करायला मोकळे.’’ दीप्तीने म्हटले.
‘‘अगं मग नको खाऊ.’’ सुनीलने म्हटले.
‘‘सामोशाचं जाऊ द्या. माझी मावशी शेजारच्या गल्लीत राहते. तिच्याकडे आपण जाऊ. ’’ दीप्तीने म्हटले.
‘‘अगं मग खा की.’’ सुनीलने नेहमीप्रमाणे री ओढली.
‘‘तुम्ही काहीही खा पण माझं डोकं खाऊ नका.’’ दीप्तीने रागाने म्हटले.
‘‘अगं मग नको खाऊस.’’ सुनीलने म्हटले. त्यानंतर दीप्तीने सुनीलला बळबळं मावशीच्या घरी नेले.
काकांनी सुनीलची चेष्टा करत विचारले, ‘‘जावईबापू, लग्नाला पाच वर्षे झालीत. पेढे खायला कधी देताय?’’
‘‘मग खा की.’’ सुनीलने उत्तर दिले.
‘‘तशी मला शुगर आहे. पण....’’ काकांनी चाचरत म्हटले.
‘‘मग नका खाऊ.’’ सुनीलने म्हटले.
‘‘तुमच्यासाठी मटण आणायला सांगते. तोपर्यंत बाकरवडी खाऊ यात.’’ मावशीने म्हटले.
‘‘मग खा की.’’ सुनीलने म्हटले.
‘‘खास तुमच्यासाठी मटण आणतो पण मी खात नाही.’’ काकांनी म्हटले.
‘‘मग नका खाऊ.’’ सुनीलने म्हटले. त्यानंतर मावशी व काकांनी काहीही विचारले तरी सुनील ‘मग खा की’ नाहीतर ‘खाऊ नका’ हे दोनच वाक्य बोलू लागला. दोन तासानंतर सुनील व दीप्ती गेल्यानंतर काका एकदम हताश झाले.
‘‘पाहुण्यांनी चांगलाच वैताग आणलाय. आता मलाही काहीही खायची इच्छा नाही.’’ काकांनी म्हटले.
‘‘मग नका खाऊ.’’ मावशीने म्हटले आणि दोघेही जोर-जोरात हसू लागले.