
पुण्यात पुन्हा उन्हाचा कडाका
पुणे, ता. ९ ः होळी दरम्यान शहरात लावलेल्या हजेरीनंतर आता पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा पुन्हा जाणवू लागल्या आहेत. शहर व परिसरात पुढील आठवडाभर पावसाची शक्यता नसून अधूनमधून अंशतः ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
गुरुवारी (ता. ९) शहरात १७.५ अंश सेल्सिअस किमान आणि ३३.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मागील दोन दिवसांपूर्वी पुण्यातील काही भागात विजांसह पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडल्या होत्या. त्यामुळे वातावरणात पसरलेल्या गारव्यामुळे कमाल तापमानात लक्षणीय घट झाली होती. दरम्यान पावसाची स्थिती निवळल्याने, पुन्हा दिवसा उन्हाचा ताप अनुभवता येत आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात येत्या मंगळवारपर्यंत (ता. १४) हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोकणात उष्णतेच्या लाटेची शक्यता
राज्यातील वादळी पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. तर शुक्रवारी (ता. १०) कोकणात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. राज्यात गुरुवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. गेल्या तीन ते चार दिवसांत राज्यात कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वाऱ्यांसह पाऊस पडला. तर काही ठिकाणी गारपीट झाले. त्यामुळे उन्हाचा ताप काहीसा कमी झाला होता. दरम्यान आता पावसाचे वातावरण निवळल्याने पारा पुन्हा चढू लागला आहे. यातच शुक्रवारी (ता. १०) सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. सोमवारपासून (ता. १३) राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होण्याचे संकेत असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.