
अवतीभवती
सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
पुणे, ता. १० ः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२६ व्या स्मृतीदिनानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, माजी नगरसेविका मनिषा लडकत, पुणे विभाग अध्यक्ष प्रीतेश गवळी, कार्याध्यक्ष सागर दरवडे, गौरी पिंगळे, प्रदीप हुमे, रवी लडकत, महेश बनकर, सुधीर होले आदी उपस्थित होते.
चारूशीला बेलसरे यांना जीवनगौरव पुरस्कार
पुणे, ता. १० ः ज्येष्ठ गायिका चारूशीला बेलसरे यांना ‘मॉम इंडिया कॅसेट कंपनी’तर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कंपनीच्या संचालिका उज्वला भंडारी यांच्या हस्ते व कंपनीचे मुख्य व्यवस्थापक मोहन भंडारी यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक हा पुरस्कार देण्यात आला. बेलसरे यांनी ‘हिट्स ऑफ लता’ या मॉम इंडियाने प्रसारित केलेल्या कॅसेटमध्ये १५ गीते गायली होती. त्या चित्रपट गीते, सुगम संगीत, भक्तिगीते, भावगीते, शास्त्रीय संगीत आदींचे विविध कार्यक्रम सादर करतात.
चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन
पुणे, ता. १० : ‘‘एखादी कला जोपासत त्या कलेशी एकरूप झाल्यानंतर ती कला मनाला सुंदर बनवते. ही कलेची खरी ताकद आहे,’’ अशी भावना शहर पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी व्यक्त केली. योगिनी आडकर, भाग्यश्री जोशी-थत्ते या महिला कलाकारांच्या बालगंधर्व कलादालनात आयोजित चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी अॕड. मकरंद आडकर, माजी महापौर श्रीकांत शिरोळे, योगिनी आडकर आदी उपस्थित होते. ‘‘आज सर्वच क्षेत्रात स्त्रियांनी आपले अस्तित्व निर्माण केले आहे. हीच खरी परिवर्तनाची नांदी आहे’’, असेही पाटील यांनी सांगितले.