जेजुरी गड संवर्धनासाठी १०९ कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेजुरी गड संवर्धनासाठी १०९ कोटी
जेजुरी गड संवर्धनासाठी १०९ कोटी

जेजुरी गड संवर्धनासाठी १०९ कोटी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १० : जेजुरी गडाचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून पुनर्विकास करण्यासाठी राज्य सरकारने १०९ कोटींचा निधी मंजूर केला आहे. येत्या पंधरवड्यात त्याबाबतचे कार्यादेश निघण्याची शक्यता आहे. विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात गडपायथा व शहराच्या विकासाचे नियोजन करण्यात येत आहे. गडावर पूर्वी सुमारे दीडशे दीपमाळा होत्या. कालौघात त्या नामशेष झाल्या. त्यातील अधिकाधिक दीपमाळांचे संवर्धनही या पहिल्या टप्प्यात होणार आहे.
मंदिराचा गडावरील परिसर एक हजार २४० चौरस मीटर असून पहिल्या टप्प्यातील कामात मंदिराचे संवर्धन आहे त्या स्थितीत केले जाणार आहे. त्यासाठी १७ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. गडाचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लक्षात घेता हे काम राज्य पुरातत्त्व विभागामार्फत केले जाणार आहे.
मंदिराचे काम हे मुख्यत्वे दगडात केलेले आहे. त्यामुळे जीर्ण झालेले दगड बदलण्यात येणार आहेत. तर सुस्थितीत असलेल्या दगडांना पॉलिश करण्यात येणार आहे. गडावर पूर्वी दीडशे दीपमाळा असल्याचे आढळले आहे. या सर्व दीपमाळा सध्या पुनर्स्थापित करता येणे शक्य नसले तरी त्यातील अनेक दीपमाळांना पुन्हा उभारले जाणार आहे. सध्याच्या दीपमाळांचे संवर्धन दगडांना बदलून पॉलिश करून केले जाणार आहे. हे काम चुन्यात केले जाणार आहे. मंदिर व्यवस्थापनाकडून तात्पुरती डागडुजी करण्यात येते. ती परिस्थितीनुसार असली तरी अभ्यासपूर्ण नसते. त्यामुळे अशा डागडुजीला आता नवे स्वरूप मिळणार आहे.

मंदिर संवर्धनाचा पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यात शहराचा विकास, रस्ते, पाणी, निवासी व्यवस्था याचा आराखडा तयार केला जात आहे. लवकरच त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल.
-किरण इंदलकर, जिल्हा नियोजन अधिकारी