
जयघोषात रंगला शिवजन्म सोहळा
पुणे, ता. १० ः चौकाचौकात लावलेल्या भगव्या पताका, भगवे झेंडे, भगव्या रंगांचे मंडप अन् गळ्यात भगवे उपरणे घातलेले हजारो शिवप्रेमी. अशा आनंदोत्साही वातावरणात शुक्रवारी लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीत तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवप्रेमींनी शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून जयघोष केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांची शुक्रवारी तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्यात आली. अनेक धार्मिक, सामाजिक संस्था, संघटनांनी एसएसपीएमएस येथील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवप्रेमींनी लाल महाल येथे जाऊन शिवराय, राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांनाही अभिवादन केले. काही मंडळांनी चौकाचौकांमध्ये शिवजयंती साजरी केली. मंडळांनी आकर्षक स्वागत कमानी, मंडप व शाहिरी, पोवाडे लावून वातावरणात आनंदोत्साह निर्माण केला.
दरम्यान, श्री कसबा गणपती शिवजयंती उत्सव समितीकडून संस्थेच्या कलाकारांनी लाल महालात शिवजन्म सोहळा आयोजित केला होता. त्यानंतर संस्थेच्या कलाकारांनी ‘गड आला, पण सिंह गेला’ हे नाटक सादर केले. याबरोबरच महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या वतीने पालखी सोहळा घेण्यात आला. भवानी पेठेतील भवानी मातेच्या मंदिरात वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांच्या हस्ते देवीची आरती झाल्यानंतर पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. सायंकाळी पाच वाजता पालखीला सुरुवात झाली. भवानी पेठ, नाना पेठ, लक्ष्मी रस्तामार्गे लाल महाल येथे आली. बॅंड, हलगी पथकाच्या निनादात हा सोहळा रंगला होता. आमदार रवींद्र धंगेकर, परिषदेचे अध्यक्ष दादा पासलकर, राम तोरकडी, प्रकाश ढवळे, राजेंद्र जाधव आदी या वेळी उपस्थित होते. PNE23T29825