करिअरचे ध्येय निश्चित करणे आवश्यक
पुणे, ता. ११ ः ‘‘क्षेत्र कोणतेही असो, त्यात करिअरचे ध्येय विद्यार्थ्यांनी निश्चित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी जे क्षेत्र निवडले, त्यात जर अपयश आले तर हार मानून मेहनत करायला सोडू नका. त्यातून मिळालेले ज्ञान हे महत्त्वाचे असते आणि ते भविष्यात कामी येते. त्यामुळे ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यासाठी आवश्यक गुण, कौशल्य आपल्यात आहे का, व ते कसे मिळवावे याचे भान ठेवूनच विद्यार्थ्यांनी करिअरची निवड करावी’’, असे मत करिअर सल्लागार रवींद्र बाळापुरे यांनी व्यक्त केले.
‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे ‘करिअर डेव्हलपमेंट स्कीम’ (सीडीएस) या शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी बाळापुरे बोलत होते. बुधवार पेठेतील सकाळ कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’चे विश्र्वस्त महेंद्र पिसाळ, रमेश बोडके तसेच विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
बाळापुरे म्हणाले, ‘‘दहावी आणि बारावीच्या शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना पुढे काय करायचे, हा खरा संघर्ष सुरू होतो. या वयात विद्यार्थी टीव्ही, सोशल मीडिया आदींवर जे पाहतात, त्यात करिअर करण्याची इच्छा बाळगतात. आजच्या काळात शिक्षणाबरोबरच कौशल्याला महत्त्व आहे. आज कित्येक तरुण असे आहेत, ज्यांच्याकडे उच्च शिक्षणाच्या पदव्या आहेत. मात्र ते बेरोजगार आहेत. याचे मुख्य कारण म्हणजेच कौशल्याची कमतरता. त्यामुळे केवळ शिक्षण घेतल्याने हवं त्या क्षेत्रात यश मिळेल असे नाही, त्यासोबत कौशल्यही आत्मसात करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा.’’ सूत्रसंचालन गायत्री राजनकर यांनी केले.
या शिष्यवृत्तीमुळे मला खूप फायदा होणार आहे. मला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असून त्यासाठी आवश्यक ते कोर्स मी सध्या पदवीच्या शिक्षणाबरोबरच सुरू करणार आहे.’
- चेतन गेडाम, विद्यार्थी (चंद्रपूर)
रवींद्र बाळापुरे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
- तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होण्याचे स्वप्न पाहताना त्या क्षेत्रासाठी आवश्यक ते शिक्षण आणि कौशल्य याबाबत स्वतःचे आत्मनिरिक्षण करा.
- इंजिन निर्मिती, इलेक्ट्रॉनिक चिप्स निर्मिती यांसारख्या क्षेत्रात संधी मिळवली जाऊ शकते. परंतु त्यासाठीचे कौशल्य आणि अभ्यास काहीसे क्लिष्ट व ते कठीण असल्याने तरुण याकडे संधी म्हणून पाहतच नाही. देशाच्या विकासासाठी या तरुणांची व त्यांच्या कौशल्याची आवश्यकता आहे.
- पालकांनी मुलांची आवड, कल आणि कौशल्य पाहून त्यांना करिअर निवडण्यासाठी पाठिंबा द्यावा.