कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ
कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ

कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये संथपणे वाढ होत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली. राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये १२ दिवसांमध्ये आढळलेल्या ७१२ पैकी ३०८ रुग्णांचे (४३ टक्के) निदान गेल्या तीन दिवसांत झाल्याचे खात्याने प्रसिद्धी केलेल्या पत्रकातून स्पष्ट होते.
राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण तीन वर्षांपूर्वी ९ मार्चला आढळला. त्याला आता तीन वर्षे पूर्ण झाली. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी नोंदली गेली. कोरोनामुळे उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांचे प्रमाणही अत्यल्प होते. त्यामुळे आता आपण कोरोनामुक्त झालो, असा समज करून आपले दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार पाण्याने हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे विस्मरण झाल्याचे दिसते. या पार्श्वभूमिवर कोरोनाच्या रुग्णांची संख्या राज्यात वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीतून पुढे येते.

राज्यात मार्चपर्यंत प्रत्येक दिवस नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या शंभरपेक्षा कमी होती. अगदी शुक्रवारपर्यंत कोरोनाचे सर्वाधिक ९३ रुग्ण आढळले होते. मार्चच्या पहिल्या नऊ दिवसांमध्ये ४०९ रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन दिवसांमध्ये ३०८ रुग्णांचे निदान झाले. या बाबत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

कोरोना वाढीचे कारण?
राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहेत. कमाल आणि किमान तापमानातील तफावत, ढगांच्या गडगडाटासह पडलेला पाऊस आणि ढगाळ हवामान हे विषाणूंच्या वाढीसाठी पोषक ठरते. त्यातून कोरोनासह इन्फ्लूएंझा विषाणूंच्या संसर्गामुळे आजारी पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. दीपक कांबळे यांनी दिली.

राज्यात ५५१ सक्रिय रुग्ण
राज्यात आतापर्यंत ५५१ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे १८५ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्या खालोखाल मुंबईमध्ये १११ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली.

अशी घ्या काळजी...
- मास्क घालून घराबाहेर पडा
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
- हस्तांदोलन करू नका
- शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल ठेवा