हडपसर ते दिवे घाट पालखी मार्गाचे काम लवकरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हडपसर ते दिवे घाट 
पालखी मार्गाचे काम लवकरच
हडपसर ते दिवे घाट पालखी मार्गाचे काम लवकरच

हडपसर ते दिवे घाट पालखी मार्गाचे काम लवकरच

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी जिल्ह्यातील ४६० हेक्टरपैकी ४५२ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित आठ हेक्टर जागाही लवकरच ताब्यात येईल. त्यामुळे हडपसर ते दिवे घाट या रस्त्याचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच या कामाच्या निविदा काढण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे डिसेंबरपर्यंत या मार्गाचे काम पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग २३४ किलोमीटरचा असून, त्याचे सहा टप्पे आहेत. यासाठी सुमारे ७ हजार ५१६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) या महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातील पाच टप्प्यांचे काम सुरू झाले आहे. सहावा टप्पा हडपसर ते दिवे घाट असून येथील संपूर्ण जमीनही ताब्यात आली आहे. त्यामुळे या सहाव्या टप्प्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. या भूसंपादनाचे निवाडे जाहीर झाले असून, जमीनमालकांना मोबदलाही देण्यात आला आहे. हा मार्ग हडपसर-दिवेघाट-लोणंद-धर्मपुरी-खुडूस-वाखरी-मोहोळ असा असेल. हा मार्ग चारपदरी असून, तो केंद्र शासनाच्या भारतमाला प्रकल्पातून राबविण्यात येत आहे.

संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्ग १३० किलोमीटरचा असून, याचे काम तीन टप्प्यांत करण्यात येत आहे. यासाठी ४४१५ कोटींचा निधी देण्यात येणार आहे. यातील देहू ते हडपसर हा मार्ग पुणे, पिंपरी-चिंचवड या महापालिकांच्या हद्दीतून जात आहे. हा शहरी मार्ग असल्याने तो सुधारण्याबाबत महापालिका, राज्य सरकारशी चर्चा करण्यात येणार असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. हडपसर ते कासुर्डी हा राष्ट्रीय महामार्ग ६५ असून हा मार्ग चारपदरीवरून सहापदरी करण्याचे काम सुरू आहे. मात्र, याचा पालखी मार्गात समावेश केलेला नाही. पालखी मार्गात पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर व इंदापूर ते तोंडले-बोंडले अशा तीन टप्प्यांचा समावेश आहे.

या दोन्ही मार्गांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ नोव्हेंबर २०२१ रोजी झाले होते. त्यानंतर या मार्गांच्या भूसंपादनाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. त्यासाठी थेट खरेदीने भूसंपादन करण्यात आले. या दोन्ही मार्गांसाठी जिल्ह्यातील ४६० हेक्टर जमिनीची आवश्यकता होती. त्यानुसार आतापर्यंत ४५२ हेक्टर भूसंपादन झाले आहे. उर्वरित आठ हेक्टरही लवकरच ताब्यात येणार आहे.
डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी