
ताण असेल तर मन मोकळे करा मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला
पुणे, ता. १५ : मनावर कोणताही ताण असेल तर पहिल्यांदा इतरांसासोबत आपले मन मोकळे करा. संकटात संकोच न बाळगता इतरांची मदत घ्या. आपल्याला कोण काय म्हणेल, याकडे दुर्लक्ष करा. वास्तविकतेचे भान ठेवा आणि आर्थिकबाबतीत झेपेल तेवढेच अंगावर घ्या, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.
सध्या कौटुंबिक ताण आणि आर्थिक अडचणींमुळे कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. औंधमध्ये एका आयटी अभियंत्याने पत्नी आणि मुलाचा खून करून आत्महत्या केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मानसोपचार तज्ज्ञांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अरुणा कुलकर्णी म्हणाल्या, कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती अडचणीत असल्यास वागण्यात फरक पडतो. त्याचे रुपांतर नैराश्यात होऊ शकते. सध्या घराचा, गाडीचा हप्ता यांचा ताण असतो. परंतु वास्तविकतेचे भान ठेवणे आवश्यक आहे. कौटुंबिक किंवा पती-पत्नींमध्ये वाद असल्यास ते सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न करावा. वेळीच समुपदेशक आणि मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी.
मानसिक आरोग्याकडे द्या लक्ष
वेळेवर मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. जवळच्या व्यक्तीसोबत मन मोकळे करा. आर्थिक संकट हे सर्वांनाच आहे. पण त्यातूनही एखादा व्यवसाय किंवा नोकरी करून पैसा कमावता येतो. परंतु मानसिक आरोग्य हे महत्त्वाचे आहे. अडचणींना आत्मविश्वासाने सामोरे जा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ शिवनारायण खांडरे यांनी दिला.