अवकाळी पावसाने पालिकेची पोलखोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवकाळी पावसाने पालिकेची पोलखोल
अवकाळी पावसाने पालिकेची पोलखोल

अवकाळी पावसाने पालिकेची पोलखोल

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : पावसाळ्याआधी नाले आणि गटार साफ करण्यासाठी, पाणी तुंबणाऱ्या १४६ ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात बैठक घेऊन पावसाळापूर्व कामाची तयारी सुरू केल्याचा दावा केला होता. पण शहरात अवघा पाऊणतास अवकाळी पाऊस झाला आणि त्या दाव्याची पोलखोल झाली. कोथरूडमध्ये गेल्यावर्षी ज्या भागात पाणी साचले होते, पुन्हा त्या ठिकाणी पाणी जमा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पावसाळ्यापूर्वी सुमारे २० कोटी रुपयांची निविदा काढून मे महिन्यात महापालिकेकडून नालेसफाई, गटारांची स्वच्छता केली जाते. तरीही पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी ऑक्टोबरमध्ये शहरात झालेल्या पावसामुळे मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील नाल्यांना, रस्त्यांना तलावांचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर पुन्हा पाणी तुंबणार नाही यासाठी उपाययोजना केल्या जातील असा दावा आयुक्त विक्रमकुमार यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात आयुक्तांनी पावसाळापूर्व तयारीची बैठक घेतली होती. त्यामध्ये मेट्रोच्या कामासह इतर कारणांमुळे शहरात जेथे जेथे पाणी तुंबते तेथे दुरुस्ती करा असे आदेश दिले होते. पण ही बैठक होऊन एक महिना होण्याच्या आतच अवकाळी पाऊस झाला आणि शहरात सुधारणा झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले.

बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे टिळक रस्ता, हिराबाग चौक, लाल महालापासून पुढे शिवाजी रस्त्याचा भाग, टिळक चौक, डेक्कन जिमखाना भागात पाणी जमा झाले होते. त्यानंतर गुरुवारी दुपारनंतर अवघा अर्धा ते पाऊण तास शहराच्या विविध भागांत पाणी तुंबले. यामध्ये गेल्यावर्षी पौड फाटा, केळेवाडी, शिवतीर्थनगर, कोथरूड कचरा डेपो या भागात मेट्रोच्या दुभाजकामुळे पाणी वाहून जाण्यास जागा नसल्याने दीड ते दोन फूट पाणी तुंबले होते. याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. गेल्यावर्षीदेखील या भागात हीच स्थिती होती. त्यामुळे कोणत्याही सुधारणा झाल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवार पेठेतील अमृतेश्‍वर मंदिर येथेही पाणी तुंबू नये, यासाठी उपाययोजना केली नाही.

पावसाळी गटार सफाईची निविदा संपली
पावसाळी गटार सफाईसाठी मलनिस्सारण विभागाकडून काढलेली निविदाही संपली आहे. आता एप्रिल महिन्यात नव्याने निविदा काढली जाईल, त्याचीही मुदत अवघ्या सहा महिन्यांची असणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरनंतर शहरात पावसाळी गटारांची स्वच्छता होत नसल्याचे समोर आले आहे.

अवकाळी पावसामुळे शहरात पाणी तुंबल्याने त्यासंदर्भात आयुक्तांनी आढावा घेऊन त्वरित सुधारणा करण्याचे आदेश आहेत. त्यासाठी मलनिःसारण विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ दिले जाणार आहे. तसेच एप्रिल महिन्यापासून नाले सफाई व पावसाळी गटारांच्या सफाईच्या निविदांमधून काम सुरू केले जाईल. मेट्रोच्या कामामुळे ज्या भागात पाणी तुंबते तेथेही पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था केली जाईल.’’
- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका