
संपामुळे रखडले अवकाळीचे पंचनामे
पुणे, ता. १६ : जुन्या निवृत्तिवेतन योजनेच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम आता नागरिकांवर जाणवू लागला आहे. त्यातच राज्यासह पुणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू असून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. परंतु, अधिकारी, कर्मचारी संपात सहभागी असल्याने पंचनामे रखडल्याने याचा परिणाम थेट शेतकऱ्यांवर होत आहे. तर अन्य विभागांत कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांनाही त्याचा फटका बसू लागला आहे.
नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालय, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालय, तहसील, महावितरण कार्यालय, परिवहन कार्यालयांमधील कर्मचारी या संपात सहभागी आहेत. त्यामुळे वाहननोंदणीपासून, दस्तनोंदणीच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे गुरुवारीदेखील शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. तसेच, व्यावसायिकांनाही या संपाचा आर्थिक फटका बसू लागला आहे. अवकाळीने होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे वेळेत होणे अपेक्षित आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने संपातील कर्मचाऱ्यांना नोटीस काढूनही संपकरी मागण्यांवर ठाम असल्याने पंचनाम्याचे काम रखडले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून संपातील कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र शेतकऱ्यांचे पंचनामे रखडणार नाही यासाठी नायब तहसीलदार यांच्यावर जबाबदारी सोपवून स्थानिकांकडून मदतीद्वारे पंचनामे करण्याबाबत आदेश दिले आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनीदेखील परिसरातील गावांमधील माहिती तत्काळ नायब तहसीलदार यांना देऊन मदत करावी.
- हिम्मत खराडे, निवासी उपजिल्हाधिकारी