टेमघर धरणाच्या गळतीचे प्रमाण ९६ टक्क्यांनी कमी : फडणवीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेमघर धरणाच्या गळतीचे प्रमाण 
९६ टक्क्यांनी कमी : फडणवीस
टेमघर धरणाच्या गळतीचे प्रमाण ९६ टक्क्यांनी कमी : फडणवीस

टेमघर धरणाच्या गळतीचे प्रमाण ९६ टक्क्यांनी कमी : फडणवीस

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी दुरुस्तीच्या कामावर ९१ कोटी ६६ लाख रुपये खर्च झाला आहे. धरणाच्या एकूण कामाकरिता आतापर्यंत ४५६ कोटी ५८ लाख रुपये इतका खर्च झाला आहे. सहा वर्षांपूर्वी धरणातून पाणीगळतीचे प्रमाण २ हजार ५८७ लिटर प्रति सेकंद एवढे होते. दुरुस्तीमुळे गळतीचे प्रमाण ९६ टक्के म्हणजे १९७ लिटर प्रति सेकंद एवढे कमी झाले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात दिली आहे. दरम्यान, सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी दुरुस्तीचे काम जुलै २०२० पासून थांबविण्यात आले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

टेमघर धरणातून पाण्याची गळती होत असल्याबाबत आमदारांनी प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना जलसंपदामंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. धरणातून होणारी गळती रोखण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू करण्यात आली होती. ही कामे १०० टक्के पूर्ण करण्यासाठी चालू निविदेतील ५२.९५ कोटी रुपये व अद्याप निविदा निश्चित न झालेल्या कामासाठी ४६.०८ कोटी अतिरिक्त निधी आवश्‍यक आहे. धरणाची गळती रोखण्याच्या कामांकरिता ९९ कोटी व धरण सुरक्षिततेच्या कामांसाठी ९५ कोटी ५७ लाख रुपये प्रस्तावित आहेत. हा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला असून प्रस्तावावर कार्यवाही करण्यात येत आहे. टेमघर प्रकल्पास द्वितीय प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाची उर्वरित कामे तातडीने हाती घेण्याचे नियोजित असल्याचे फडणवीस यांनी उत्तरात म्हटले आहे.

टेमघर धरणाची तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ६ ऑगस्ट २०१६ मध्ये व ३१ ऑगस्ट २०१९ मध्ये पाहणी केली असून, त्यांना धरणामध्ये गळती होत असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच, धरण गळती प्रतिबंधक कामे हाती घेतल्यानंतर मार्गदर्शनासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे एकूण १० पाहणी दौरे व बैठका झाल्या असून गळती प्रतिबंधक कामांबाबत तज्ज्ञ समितीने समाधान व्यक्त केले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.