
बारा ॲमेनिटी स्पेसचा पीएमआरडीएकडून लिलाव
पुणे, ता. १७ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) हस्तांतरित करण्यात आलेल्या ॲमिनिटी स्पेसच्या जागांचा लिलाव करण्यात येणार आहे. भूगाव, हिंजवडी, कासारआंबोली, माण, पिरंगुट या पाच गावांमधील १२ ठिकाणच्या भूखंडांचा लिलाव केला जाणार आहे. हा लिलाव ऑनलाइन पद्धतीने होणार असून, यातून कमीत कमी ३६ कोटी रुपयांचा निधी मिळण्याची अपेक्षा आहे.
पीएमआरडीएकडून पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरिता निधी उभारणीचा स्रोत म्हणून ॲमिनिटी स्पेस हस्तांतरित झालेल्या जागांचा लिलाव करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने म्हणजे ८० वर्षांच्या कालावधीसाठी हे भूखंड दिले जाणार आहेत. हे लिलाव ऑनलाईन पध्दतीने होत असून त्यासाठी नागरिकांना ई बोली लावावी लागणार आहे. येत्या सोमवारपासून (ता. २०) नावनोंदणी करता येणार आहे. नोंदणी करणाऱ्यांनाच ई-बोलीमध्ये सहभागी होता येणार आहे. ऑनलाइन लिलाव होणार असल्याने यामध्ये पूर्णत: पारदर्शकता राहणार असल्याचे प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.