
शहरात कोयता गँगने पुन्हा डोके वर काढले
पुणे, ता. २१ : शहरात कोयता गँगने पुन्हा डोके वर काढले आहे. पर्वती गावात कोयता गँगने जुन्या भांडणातून एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. येरवड्यातील मॉलमध्ये गुन्हेगारांनी कोयत्याने दहशत पसरवत दमदाटी केली. लोहगाव परिसरात कोयत्याने तरुणाच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. तसेच, सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ कोयता गॅंगने एका तरुणावर कोयत्याने वार केले. या घटनांमुळे शहर आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पर्वती गावात तरुणावर कोयत्याने वार
हा प्रकार शनिवारी (ता. १८) दुपारी दीड वाजता पर्वती गावात बॅंकेजवळ घडला. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी नवनाथ वाडकर आणि शेखर वाघमारे (दोघे रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आयुष विठ्ठल चव्हाण (वय २१, रा. साईलीला सोसायटी, वाघोली) असे जखमीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवनाथ याची आश्विन रेणुसे याच्याशी काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. आयुष हा त्याचे मित्र आश्विन आणि मुसा पटेल यांच्यासमवेत दुचाकीवरुन जात होता. पर्वती पायथा परिसरात आल्यानंतर आरोपींनी आयुष आणि त्याच्या मित्रांना अडवले. वाडकर याने आयुष याच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली.
येरवड्यातील मॉलमध्ये कोयत्याची दहशत-
गुन्हा मागे न घेतल्याच्या कारणावरून सराईत गुन्हेगारांनी एका तरुणाला कोयत्याने धमकावले. तसेच, कॉफी शॉपच्या काउंटरवर कोयत्याने वार करून महिलेसह दोघांना दमदाटी केली.
ही घटना येरवडा येथील ईशान्य मॉलमधील कॉफी शॉपमध्ये शनिवारी (ता. १८) सायंकाळी घडली. याबाबत रोहित राजेंद्र वाघमारे (वय २१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याने फिर्याद दिली. त्यावरून येरवडा पोलिसांनी सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. निखिल मधुकर कांबळे, हुसेन युनूस शेख, हर्ष जाधव, सिद्धार्थ भोला, साहिल पीटर कांबळे, सुदेश रूपेश गायकवाड आणि तुषार चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत.
कोयत्याने तरुणाच्या डोक्यात वार
कबुतरे चोरल्याच्या वादातून तिघांनी एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. या हल्ल्यात साहिल सतीश गायकवाड (वय २२, रा. ओहाळ वस्ती, लोहगाव) हा गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना लोहगाव स्मशानभूमीजवळ शुक्रवारी(ता. १६) रात्री घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अक्षय सगळगिरे, अभी धिवार आणि अन्य एका तरुणाविरुद्ध (तिघे रा. लोहगाव) गुन्हा दाखल केला आहे.
नांदेड फाट्याजवळ कोयता गॅंग पुन्हा सक्रिय
किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ गोसावी वस्ती येथे कोयता गॅंग पुन्हा सक्रिय झाली आहे. एका टोळीने कोयत्याने केलेल्या हल्ल्यात विजय विठ्ठल मरगळे (वय ३१, रा. नांदेड, ता. हवेली) हा तरुण जखमी झाला. याबाबत हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मरगळे हा गोसावी वस्ती येथील त्याच्या मित्राच्या घरी गेला होता. मित्र आणि तो खाली इमारतीच्या पार्किंगला थांबलेले असताना अचानक हातात कोयते, लोखंडी रॉड घेऊन आलेल्या पाच-सहा जणांनी विजयवर हल्ला केला.
याप्रकरणी सूरज ऊर्फ सागर संतोष सहा (वय २१), मुकुंद ऊर्फ मुक्या चंद्रकांत चव्हाण (वय २३), शुभम ऊर्फ झेंड्या दिलीप पवार (वय २२) व अजय विजय आठवले (वय १९, सर्व रा. गोसावी वस्ती) यांच्यावर हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे.