
ससून रुग्णालयातील सेवा सुरळीत
पुणे, ता. २० ः ससून रुग्णालयातील रुग्णसेवा सोमवारी रात्रीपासून पूर्ववत सुरू झाली. मात्र दिवसभर रुग्णांची गैरसोय झाली. गेल्या सात दिवसांपासून जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपाचा परिणाम ससूनमधील रुग्णसेवेवर झाला होता. दरम्यान, संपावर गेलेले वर्ग ३ व ४चे कर्मचारी मंगळवारपासून कामावर हजर हाेणार आहेत.
या संपात शंभर टक्के परिचारिका सहभागी झाल्या हाेत्या. त्यामुळे सर्व सेवा प्रशिक्षणार्थी १५० परिचारिकांवर होती, तर तत्पुरत्या भरती केलेल्या १२० परिचारिकांची मदत घेण्यात आली होती. परंतु दरराेजची रुग्णसंख्या आणि परिचारिकांचे प्रमाण व्यस्त होते. त्यामुळे रुग्णांना वेळेला उपचार मिळण्यास अडचणी येत होत्या. दरम्यान, याबाबत ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर म्हणाले, ‘‘करार तत्त्वावरील परिचारिकांना २९ दिवस कामावर ठेवणार असून, त्यांना २९ दिवसांचे वेतन देणार आहोत. संपादरम्यान आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवली, तसेच अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे रुग्णसेवेवर संपाचा फारसा परिणाम जाणवला नाही.’’
साेमवारी झालेली रुग्णसेवा
नवीन ॲडमिशन ः १०९
ओपीडी ः १४८०
आंतरविभागात दाखल रुग्ण ः ८०१