
शिवाजीनगर आगाराचा प्रश्न अनुत्तरितच
पुणे, ता. २३ ः शिवाजीनगर बस स्थानक मूळ जागीच होणार आहे. मात्र, शिवाजीनगर आगार कुठे करायचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय येथील प्रस्तावित मल्टी मॉडेल ट्रान्स्पोर्टेशन हबच्या बाबतही अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. एसटी प्रशासन या विषयीचा अहवाल १५ दिवसांत तयार करून मेट्रो प्रशासनाला सादर करणार आहे. त्यानंतरच आगार कुठे करायचा हा प्रश्न सुटणार आहे.
शिवाजीनगर बस स्थानकांबाबत नुकतेच एसटी प्रशासन व मेट्रो प्रशासन यांच्यात बैठक झाली. या बैठकीत शिवाजीनगर बस स्थानकाचा प्रश्न सुटला आहे. शिवाजीनगर बस स्थानक मूळ जागीच उभारण्यात येणार असून यासाठी किमान ६०५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
...तर एसटीचे डेड मायलेज
शिवाजीनगर बस स्थानक बांधल्यावर उर्वरित जागेवर कर्मशिअल कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आगारासाठी जागा उपलब्ध नाही. अशा स्थितीत भुयारी आगार बांधण्याचा विचार पुढे आला. मात्र, त्यामुळे खर्चात मोठी वाढ होईल. त्यामुळे हा विचार मागे पडला आहे. तर काहींनी सांगवी येथे एसटीचे आगार करण्याचा विचार मांडला. मात्र सांगवीवरून शिवाजीनगरला बस रिकामी बस घेऊन येणे व जाणे यामुळे एसटीला फटका बसेल. कारण, यामुळे एसटीचे डेड मायलेज वाढणार आहे. त्यामुळे एसटी प्रशासन हा निर्णय घेण्यास तयार नाही. त्यामुळे आगार कुठे करायचे हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
१५ दिवसांत अहवाल सादर
एसटी प्रशासन शिवाजीनगर बस स्थानक बांधताना आगार कुठे करायचे व मल्टी मॉडेल हब साकारताना कर्मशिअल कॉम्प्लेक्सच्या बाबतीत व्यवहार्यता अहवाल सादर करणार आहे. १५ दिवसांत सर्व बाबींचा अभ्यास करून हा अहवाल तयार करून मेट्रो प्रशासनाला सादर केला जाईल. त्यानंतरच शिवाजीनगर बस स्थानकाच्या कामाला सुरुवात होईल.
शिवाजीनगर बस स्थानक मूळ जागीच होणार आहे. यासाठी आवश्यक त्या बाबीचा अभ्यास करून आम्ही १५ दिवसांत अहवाल देणार आहोत.
- विद्या भिलारकर,महाव्यवस्थापक (सिव्हिल), राज्य परिवहन महामंडळ, मुंबई