
ऑनलाईन वीजबिल भरण्यामध्ये पुण्याची आघाडी
महावितरण लोगो
47722
---
विजबील ऑनलाइन भरण्यात पुण्याची आघाडी
२० लाख १५ हजार ग्राहकांकडून ५६४ कोटी ९९ लाखांचा भरणा
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ६ : महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा करण्यात राज्यातील आघाडी कायम ठेवली. मे महिन्यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिकसह इतर २० लाख १५ हजार लघुदाब वीजग्राहकांनी वीजबिलापोटी ५६४ कोटी ९९ लाख रुपयांचा भरणा ‘ऑनलाइन’ केला. त्यात बंडगार्डन विभागातील सर्वाधिक एक लाख ९१ हजार ९१३ ग्राहकांचा समावेश आहे.
उर्वरित शिवाजीनगर, कोथरूड, नगररोड, पद्मावती, पर्वती व रास्तापेठ विभागांमध्ये सरासरी १ लाख ५६ हजार ३८५ वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास पसंती दिली आहे.
पुणे परिमंडलात ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात पिंपरी चिंचवड शहरातील ग्राहकांची संख्याही वाढते आहे. गेल्या महिन्यात या विभागातील ३ लाख ८ हजार ११६ तर भोसरी विभागातील २ लाख १९ हजार ९४८ ग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. पुणे ग्रामीणमध्ये रांगेत उभे न राहता ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास प्रतिसाद वाढला आहे. यात गेल्या महिन्यात आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यातील ३ लाख ५६ हजार ९४५ ग्राहकांनी १०३ कोटी २ लाख रुपयांचा सुरक्षितपणे भरणा केला आहे.
पुणे परिमंडलात वाढता प्रतिसाद
कालावधी ग्राहकांची संख्या
एप्रिल ते सप्टेंबर २०२२ १७,४१८६०
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ १८,६४८२०
जानेवारी ते मे २०२३ २०,२११३०
दरमहा सरासरी १,५६३३०
---
मे महिन्याची आकडेवारी
विभाग ग्राहकांची संख्या ऑनलाइन भरणा
पुणे शहर ११,३०२२५ ३१२ कोटी ८७ लाख
पिंपरी-चिंचवड ५,२८०६४ १४९ कोटी १० लाख
---
महावितरणकडून बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्याऐवजी किंवा कार्यालयीन वेळेतच वीजबिल भरण्याऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व २४ तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व इतर लघुदाब ग्राहकांना www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल ॲप उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरणे तसेच सर्व वीजजोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
--------
इन्फोबॉक्स
लघुदाब वीजग्राहकांनी क्रेडिट/डेबीट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकींग, मोबाईल वॉलेटदवारे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा बिल भरणा आता नि:शुल्क आहे. विशेष म्हणजे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा केल्यानंतर लगेचच संबंधीत ग्राहकांना मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोच देण्यात येते.
----------
पुणे परिमंडलातील वीजग्राहकांची ‘गो-ग्रीन’ योजनेत व ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात राज्यामध्ये आघाडी कायम आहे. ‘गो-ग्रीन’मध्ये इमेलद्वारे प्राप्त झालेले वीजबिल तसेच ‘ऑनलाइन’ भरणा केलेली पावती मोबाईल किंवा संगणकात जतन करून ठेवता येते व कधीही प्रिंट काढता येते. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेला व ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास प्रतिसाद द्यावा.
- राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, महावितरण
----------------------------------