नदी काठ सुधार प्रकल्पात देशी वृक्ष लागवड

नदी काठ सुधार प्रकल्पात देशी वृक्ष लागवड

पुणे, ता. ५ ः महापालिका प्रशासनाने पर्यावरण दिनाचे निमित्त साधत मुळा-मुठा नदी काठ सुधार प्रकल्पामध्ये सोमवारी देशी वृक्ष लावण्यास प्राधान्य दिले. येरवडा येथील गणेश घाट ते सादलबाबा दर्गा या पट्ट्यामध्ये देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सकाळी येरवडा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. या वेळी प्रकल्प अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

नदी काठ सुधारणा प्रकल्पाअंतर्गत येरवडा येथील सादलबाबा दर्गा ते गणेश घाट दरम्यानच्या पट्ट्यामध्ये ३०० मीटरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रकल्प आराखड्यानुसार या ठिकाणी देशी वृक्ष लावण्यात येणार असून त्याची सुरुवात जानेवारीत करण्यात आली. नदी काठ सुधार योजनेअंतर्गत शहरातून वाहणाऱ्या मुळा- मुठा नदीचा सुमारे ४४ किमीच्या किनाऱ्याचे या प्रकल्पाअंतर्गत सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम ११ टप्प्यांमध्ये करण्यात येत आहे. त्यापैकी टप्पा क्रमांक नऊ व अकरामधील सुभाबूळ, कुभाबूळ, काटेरीबाभूळ, विलायती चिंच अशा विदेशी प्रजातीतील एक हजार ७८७ झाडे काढावी लागणार आहेत. दरम्यान, पर्यावरणप्रेमींनी ही झाडे काढण्यास विरोध दर्शविला आहे.

६९ हजार झाडे लावणार
विदेशी वृक्षांमुळे पक्षी, प्राण्यांच्या अधिवासाला कुठलाही उपयोग होत नाही. त्यामुळे संबंधित झाडे काढून त्या ठिकाणी करंज, मेढसिंगी, कांचन, कदंब, साग, मुचकुंद, रक्तरोहिडा, पिंपळ, कैलासपती, आंबा, जांभूळ, भोकर, खिरणी, घोळ, अर्जुन, लिंब, वड अशी पक्षी व प्राण्यांसाठी उपयुक्त ठरणारी देशी झाडे लावण्याचे महापालिकेने निश्‍चित केले आहे. या संपूर्ण प्रकल्पामध्ये ६९ हजार नवी झाडे लावण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com