पुणे विद्यापीठाला गटबाजी, राजकारणाचे ग्रहण

पुणे विद्यापीठाला गटबाजी, राजकारणाचे ग्रहण

विद्यापीठ फोटो
57424-2
---
रिक्त पदे, समन्वयाअभावी गुणवत्तेला ‘फटका’
विद्यापीठाची घसरण सल्लागारांमुळेच

गजेंद्र बडे ः सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. ६ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कामकाजात गेल्या काही वर्षांपासून राज्यपाल नियुक्त सल्लागारांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ते सल्ल्याऐवजी थेट आदेशच देत असल्याने कामकाज विस्कळित होत आहे. याशिवाय शिक्षणक्षेत्र किंवा अभ्यासक्रमाशी संबंधित नसलेल्या व्यक्तींची वाढती ढवळाढवळ हे सुद्धा विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याचे नुकसान करीत आहे. परिणामी राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) विद्यापीठाची घसरण झाली आहे.
यामुळे विद्यापीठात शैक्षणिक उपक्रमांऐवजी अशैक्षणिक कामांचीच संख्या वाढली आहे. यातच प्राध्यापकांमधील गटबाजी, अंतर्गत मतभेद, उच्चपदस्थांसह विविध रिक्त पदे आणि समन्वयाच्या अभावाची भर पडल्याने मोठी घसरण झाल्याचा दावा पुणे शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अधिव्याख्याते, प्रपाठक आणि प्राध्यापकांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला. विद्यापीठाला शैक्षणिक गुणवत्तेचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी या सल्लागारांना त्वरित हटविण्याची गरज असल्याचे मतही या सर्वांनी व्यक्त केले.
अशैक्षणिक कामे मोठ्या प्रमाणात वाढल्याने, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग हा कामापासून आणि पर्यायाने ध्येयापासून दूर गेला आहे. हे टाळून गुणवत्ता वाढण्यासाठी शिक्षणक्षेत्राशी संबंधित नसलेल्या व्यक्तींचा वाढता हस्तक्षेप थांबवून पुन्हा सर्वांनी समन्वयाने आणि एकजुटीने प्रयत्न करण्याची मागणी या सर्वांनी केली.केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या क्रमवारीत पुणे विद्यापीठाची शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यापीठाची २५ वरून ३५ अशी दहा क्रमांकांनी, तर विद्यापीठांच्या क्रमवारीत १२ वरून १९ अशी सात क्रमांकांनी घसरण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर अधिव्याख्याते, प्रपाठक आणि प्राध्यापकांनी मंगळवारी आपली व्यथा मांडली.
---

घसरणीची मुख्य कारणे

- शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित नसलेल्या व्यक्तींचा अनावश्‍यक हस्तक्षेप
- अधिव्याख्याते, पाठक व प्राध्यापकांसह अनेक पदे रिक्त
- अनुभवी प्राध्यापकांचा अभाव
- विद्यापीठात वाढलेली अशैक्षणिक कामे
- प्राध्यापकांमधील अंतर्गत गटबाजी

गुणवत्तावाढीसाठी उपाययोजना

- गुणवत्तेला मारक ठरणाऱ्या सल्लागारांची हकालपट्टी करणे
- प्राध्यापकांमधील अंतर्गत गटबाजी कमी
करणे
- पूर्वीप्रमाणे समन्वयातून एकजुटीने शैक्षणिक कामे करणे
- संशोधन व पेटंटची संख्या वाढविण्यावर भर देणे
- अनुभवी प्राध्यापकांना सामावून घेणे

अपात्र सदस्य पुन्हा पात्र कसे?

विद्यापीठातील विविध अभ्यास मंडळावरील १२० सदस्यांना दोन आठवड्यांपूर्वी अपात्र ठरवत, त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. यासाठी सदस्यांकडे आवश्यक पात्रता नसल्याचे या नियुक्त्या रद्द करताना सांगण्यात आले. मात्र अवघ्या दोन आठवड्यांतच हा निर्णय फिरविण्यात आला आणि ११० सदस्यांना पुन्हा नियुक्त करण्यात आले. यामुळे अपात्र सदस्य हे दोनच आठवड्यांत पात्र कसे ठरले, असा सवाल काही प्राध्यपकांनी उपस्थित केला आहे.

शिक्षण तज्ज्ञ काय म्हणतात?

पुणे शहर व जिल्ह्यातील विविध महाविद्यालये आणि विद्यापीठातील विविध विभागांमधील अधिव्याख्याते, प्रपाठक, प्राध्यापक आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची अनेक पदे गेल्या अनेक वर्षांपासून तशीच रिक्त आहेत. ही रिक्त पदे न भरणे, जुन्या-जाणत्या व अनुभवी प्राध्यापकांचा अभाव आणि अशैक्षणिक कामे वाढल्यानेच त्याचा पुणे विद्यापीठाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सर्व रिक्त पदे तातडीने भरली पाहिजेत.

- डॉ. गजानन एकबोटे, व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य
---
गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठाच्या कामकामाजात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. शिवाय संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांची संख्या कमी झाली आहे. गुणवत्तावाढीसाठी संशोधन, नावीन्यपूर्ण उपक्रम वाढविणे आवश्‍यक आहे. सर्वांनी समन्वयाने आणि एकजुटीने काम केले पाहिजे. त्यामुळे हा समन्वय वाढविण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली पाहिजे.

- प्रा. डॉ. सुधाकर जाधवर, अध्यक्ष, अखिल भारतीय प्राचार्य संघटना
---
विद्यापीठातील कामकाजात शिक्षणक्षेत्राशी सबंध नसलेल्या व्यक्तींचा प्रचंड हस्तक्षेप वाढला आहे. या हस्तक्षेपामुळे कुलगुरुंसह सर्व उच्चपदस्थ अधिकारी, अधिव्याख्याते, प्रपाठक आणि प्राध्यापकांना काम करणे मोठे जिकिरीचे होऊन बसले आहे. याचा थेट परिणाम हा गुणवत्तेवर झाला आहे. पुन्हा गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षणक्षेत्राशी संबंधित नसलेल्या व्यक्तींचा हस्तक्षेप थांबणे आवश्‍यक आहे.

- प्रा. डॉ. हर्ष गायकवाड, अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
---

महत्त्वाची चौकट
एंगेजमेंट लोगो लावणे
---
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या घसरणीबाबत तुमची मते, प्रतिक्रिया, सूचना आवर्जून कळवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com