तात्पुरती नोकरी असल्यामुळे पत्नीला पोटगी देण्याचा आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तात्पुरती नोकरी असल्यामुळे 
पत्नीला पोटगी देण्याचा आदेश
तात्पुरती नोकरी असल्यामुळे पत्नीला पोटगी देण्याचा आदेश

तात्पुरती नोकरी असल्यामुळे पत्नीला पोटगी देण्याचा आदेश

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः पत्नीला तात्पुरती नोकरी असल्यामुळे पोटगी देता येणार नाही, हा पतीचा युक्तिवाद फेटाळत कौटुंबिक न्यायालयाने दरमहा १० हजार रुपये देखभाल खर्च आणि १२ हजार रुपये घरभाडे देण्याचा आदेश नुकताच दिला.
संबंधित पती- पत्नीचा विवाह २०१५ मध्ये झाला. त्यांना चार वर्षांची मुलगी आहे. वैचारिक वादातून त्यांच्यात सतत भांडणे होत. त्यामुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून पत्नी माहेरी राहत आहे. दैनंदिन खर्चासाठी पतीकडून पोटगी मिळावी म्हणून तिने ॲड. जान्हवी भोसले यांच्यामार्फत येथील कौटुंबिक न्यायालयात पोटगीसाठीचा अर्ज दाखल केला होता.
पत्नी कमावती आहे म्हणून तिला पोटगी देण्याची गरज नाही, अशी भूमिका पतीने घेतली. मात्र तिला असलेला पगार, तिचा खर्च आणि मुलीची जबाबदारी लक्षात घेत न्यायालयाने दरमहा १० हजार रुपये देखभाल खर्च आणि १२ हजार रुपये घरभाडे आणि मुलीच्या शिक्षणासाठीचा खर्च देण्याचा आदेश दिला आहे.
‘‘पती लघुउद्योजक आहे. त्यांचे मासिक उत्पन्न ५० हजारांपेक्षा जास्त असून त्याच्याकडे स्वतःची सदनिका, मोटार, दुचाकी आदी मालमत्ता आहे. पत्नीची नोकरी ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे. तिला फक्त १० हजार रुपये पगार आहे. तसेच तिच्या नावावर कोणत्याही प्रकारची मालमत्ता नाही. घरभाडे, मुलीचे शिक्षण आणि दैनंदिन खर्च या बाबी तिच्या पगारात भागणे शक्य नाही,’’ असा युक्तिवाद ॲड. भोसले यांनी केला. तसेच उच्च न्यायालयाने याबाबत दिलेल्या निकालांचेही संदर्भ त्यांनी दिले. त्याची दखल न्यायालयाने घेतली आणि देखभाल खर्च, घरभाडे देण्याचा आदेश पतीला दिला.