
शिवनेरी औषधी वाटिकाचे उद्घाटन
पुणे : ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त ‘सिल्व्हर एज युटोपियन’ आणि ‘औंध मिलिटरी स्टेशन’ यांच्यातर्फे ‘शिवनेरी औषधी वाटिका’ या उद्यानाचे उद्घाटन ब्रिगेडियर जेम्स थॉमस (कमांडर शिवनेरी ब्रिगेड) आणि डॉ. मेजर अनु श्रीवास्तव (चेअरमन, शिवनेरी फॅमिली वेल्फेअर) यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. अनु यांनी प्लास्टिकच्या दैनंदिन वाढत्या वापरामुळे कॅन्सरचे प्रमाण कसे सतत वाढते आहे, याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच आपल्या जीवनशैलीत छोटे छोटे बदल करून आपण पर्यावरणावर तसेच मानवी आणि प्राणी जीवांवर होणारे प्रतिकूल परिणाम कसे थांबवू शकतो, याबद्दल त्यांनी सांगितले. अनुष्का कजाबजे यांनी ‘औषधी वनस्पतींचे आपल्या जीवनातील महत्त्व’ याविषयी सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच औषधी वनस्पतींची लागवड करण्याचे आवाहन करत, त्यासाठी लागणारी सर्व रोपे केंद्र सरकारच्या ‘आयुष मंत्रालयाद्वारे मोफत उपलब्ध करून देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेविका आरती चौंधे, संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा पिनल वानखडे, गिरीश वानखडे, सल्लागार संतोष होनकर्पे, डॉ. गौरी शिऊरकर, रोटरी प्रांतपाल मंजू फडके, गायक चंद्रशेखर महामुनी, सुयोग बागुल, नितीन शिऊरकर आदी उपस्थित होते. पूजा गिरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
संत कबीर जयंतीनिमित्त कार्यक्रम
पुणे : ‘‘संत कबीर हे वंचित बहुजन समाजाचे ‘आद्य प्रबोधनकार’ होते. समाजातील बहुसंख्य लोकांना अज्ञानातून प्रकाशाकडे नेण्याचे काम त्यांनी केले,’’ असे प्रतिपादन प्रा. रतनलाल सोनाग्रा यांनी केले. संत कबीर यांच्या जयंतीनिमित्त ‘महात्मा फुले समता प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. डॉ. बाबा आढाव हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. आढाव म्हणाले की, सामाजिक कार्यकर्त्यांनी वाचन व चिंतन केले पाहिजे, लिहिले पाहिजे. तसेच समतेचा विचार घरोघरी पोचवण्यासाठी ‘घर घर संविधान राबविण्याचे आव्हान त्यांनी केले. दिवंगत अभिनेत्री सुलोचना तसेच ओडिसा रेल्वे अपघातातील मृतांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे वसंतराव साळवे, अंकल सोनवणे, विजय जगताप, विजय जाधव आदी उपस्थित होते. मोहन वाडेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर ॲड. शारदा वाडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता काळबेरे यांनी आभार मानले.
पालकांचे पॅनकार्ड तपासण्याची मागणी
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्राथमिक शिक्षणाच्या प्रवेश प्रकियेसाठीचे प्रवेश पालकांचे पॅनकार्ड तपासूनच द्यावेत, अशी मागणी ‘भारतीय शेतकरी कामगार पक्षा’चे पुणे शहराध्यक्ष सागर नामदेव आल्हाट व गुरुदत्त कोणकेरी यांनी शिक्षण उपसंचालकांकडे एका निवेदनाद्वारे बुधवारी केली. तसेच संबंधित सर्व शाळांना त्यासंबंधीचे आदेश द्यावेत, असेही त्यांनी सांगितले. शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर व सर्वसामान्य माणसाच्या मुलांना न्याय मिळावा यासाठी आमचा लढा आहे. ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न नियमात बसत नाही अशांचे प्रवेश रद्द करावे आणि संबंधितांची चौकशी करावी, अशी मागणी आल्हाट यांनी निवेदनात केली.
मनसेतर्फे देशी रोपांचे वाटप
पुणे : ‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधत ‘पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना’ यांच्यातर्फे शनिपार चौक येथे २१०० तुळशीच्या व अन्य देशी रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी पक्षाचे नेते राजेंद्र वागसकर, सरचिटणीस गणेश सातपुते, बाळा शेडगे, प्रवक्ते योगेश खैरे, माजी नगरसेविका सुशीला नेटके, संगीता तिकोणे, शहर संघटक प्रल्हाद गवळी आदी उपस्थित होते. वसंत खुटवड, सारंग सराफ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.