‘गायत्री परिवारा’तर्फे पुस्तकांचे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गायत्री परिवारा’तर्फे पुस्तकांचे प्रदर्शन
‘गायत्री परिवारा’तर्फे पुस्तकांचे प्रदर्शन

‘गायत्री परिवारा’तर्फे पुस्तकांचे प्रदर्शन

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः अखिल विश्व गायत्री परिवारातर्फे विचारक्रांती अभियानांतर्गत सेवा शांतिकुंज हरिद्वारचे युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्य (१९११ ते १९९०) यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन शनिवारपासून (ता. ७) भरविण्यात येत आहे, अशी माहिती गायत्री परिवाराचे राजेश टेकरीवाल व हेमंत जोगळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी हरिद्वार येथील प्रा. विश्वप्रकाश त्रिपाठी, गायत्री परिवाराच्या प्रतिभा मुळे, विनोद पटेल, पद्माकर लांजेवार आदी उपस्थित होते.

टेकरीवाल म्हणाले, ‘‘आचार्यांनी गायत्री मंत्राच्या साधनेद्वारे माणसाचे परिवर्तन घडवून यावे, त्याची प्रतिभा जागृत व्हावी, चांगले विचार व चांगल्या कर्माकडे माणसाचा प्रवास होत राहावा, त्यातून कुटुंब, समाज व राष्ट्रदेखील सकारात्मक ऊर्जेने भरून जावे या उद्देशाने जन्मभरात सुमारे तीन हजार २०० पुस्तकांचे लेखन केले. आत्मबल, मनोबल वाढवून तणावातून मार्ग कसा काढावा, याविषयी पुस्तकांच्या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन करण्याकरिता हे प्रदर्शन होत आहे.’’

जोगळेकर म्हणाले, ‘‘युगऋषी पंडित श्रीराम शर्मा यांच्या पुस्तक प्रदर्शनाचे हे पाचवे वर्ष आहे. त्यांनी आपल्या ८० वर्षांच्या तपस्वी जीवनात तीन हजार २०० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. तसेच चार वेद, १०८ उपनिषदे, श्रुती व इतर ग्रंथांवर अभ्यास करून सर्वसामान्यांना समजेल, अशा स्वरूपात त्याची मांडणी केली आहे.’’

दरम्यान, हे प्रदर्शन सात ते २२ जानेवारी या कालावधीत बाजीराव रस्त्यावरील आचार्य अत्रे सभागृहात सकाळी नऊ ते रात्री साडेनऊ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.