नुक्कड, बालसाहित्य संमेलनाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नुक्कड, बालसाहित्य संमेलनाचे आयोजन
नुक्कड, बालसाहित्य संमेलनाचे आयोजन

नुक्कड, बालसाहित्य संमेलनाचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : विवेक साहित्य मंच, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नुक्कड साहित्य संमेलन आणि बालसाहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात साहित्यिक आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत, अशी माहिती विवेक साहित्य मंचच्या संयोजक अर्चना कुडतरकर, बालसाहित्यकार राजीव तांबे आणि प्रा. डॉ. आनंद काटीकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

नुक्कड साहित्य संमेलनाचे हे यंदाचे सहावे, तर बालसाहित्य संमेलनाचे पहिले वर्ष आहे. हे कार्यक्रम शनिवारी (ता. ७) व रविवारी (ता. ८) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये होणार आहे. कथाकार जी. ए. कुलकर्णी, लेखक, साहित्य समीक्षक गंगाधर गाडगीळ, लेखक शांताराम (के. ज. पुरोहित) आणि आत्मकथन लिहिणाऱ्या पहिल्या दलित स्त्री लेखिका शांताबाई कांबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू असल्याने या साहित्यिकांना संमेलन समर्पित केले आहे.

संमेलनाचे उद्‍घाटन शनिवारी (ता. ७) सकाळी नऊ वाजता साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. दोन्ही दिवस विविध सत्रांमध्ये कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये परिसंवाद, मुलाखत, नाट्यसादरीकरण, स्पर्धा, चर्चासत्रे आदींचा समावेश आहे. या संमेलनामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ डॉ. शरद कुंटे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व कथाकार भारत सासणे, ज्येष्ठ लेखिका व गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर, लेखिका डॉ. संगीता बर्वे, डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. संजीव कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, असेही कुडतरकर यांनी नमूद केले.