
अवती भवती
हुतात्मा भाई कोतवालांचा धडा
पाठ्यपुस्तकात घेण्याची मागणी
पुणे, ता. ३ : स्वातंत्र्य संग्रामात मोठे योगदान असलेल्या हुतात्मा भाई कोतवाल यांचा धडा पाठ्यपुस्तकात घ्यावा, अशी मागणी बारा बलुतेदार समाज विकास संघाने केली आहे.
नाभिक समाज व बारा बलुतेदार समाजाच्यावतीने बाजीराव रोड येथील हुतात्मा भाई कोतवाल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भाई कोतवाल चौकात अभिवादन सभेचे आयोजन केले होते. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी बारा बलुतेदार संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे शहर उपाध्यक्ष विनायक गायकवाड, आशिष महाडदळकर, गणेश कुऱ्हाडे, प्रकाश तिरलापूरकर, दीपक कुऱ्हाडे, शंकर सोनेल्लू आदी उपस्थित होते.
--------------
पोलिस भरती कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी
पुणे, ता. ३ : पोलिस भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी उमेदवारांच्या कागदपत्रांची योग्य पडताळणी करावी, अशी मागणी बाँडलेस स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने केली आहे.
यापूर्वी काही उमेदवारांनी बोगस प्रमाणपत्र सादर करून सरकारची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे या भरती प्रक्रियेत प्रामाणिक आणि मेहनत घेणाऱ्या उमेदवारांना न्याय मिळावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष लतेंद्र भिंगारे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.