
सियाचिन ग्लेशियरवर प्रथमच महिला अधिकारी
पुणे, ता. ३ ः ‘ती’ने आतापर्यंत विमान चालविले... तिने प्रत्यक्षात युद्धभूमीवर जाऊन कर्तव्यही बजावले... आता तर तिने धाडसाचे शिखर गाठत थेट जगातील सर्वात उंच अशा युद्धभूमीला गवसणी घालत पुन्हा एकदा कर्तबगारी सिद्ध केली आहे. ही देदीप्यमान कामगिरी बजावली आहे कॅप्टन शिवा चौहान यांनी. भारतीय सैन्यदलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम त्यांनी केले आहे.
भारतीय सैन्यदलाच्या इतिहासात प्रथमच एका महिला अधिकाऱ्याची नियुक्ती ‘ऑपरेशनल’ कार्यासाठी सियाचीनच्या १५ हजार ६३२ फूट उंच ठिकाणी असलेल्या ‘कुमार पोस्ट’ येथे करण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रत्येक क्षेत्रात उंची गाठत असल्याचे यातून सिद्ध होत आहे. कारगिल-लेह येथील लष्करी तैनाती आणि सियाचिन बर्फाळ प्रदेशाचे रक्षण करणाऱ्या ‘फायर अँड फ्युरी कोअर’ने मंगळवारी (ता. ३) कोअर ऑफ इंजिनियर्समधील कॅप्टन चौहान यांना कुमार पोस्ट येथे तैनात केल्याचे जाहीर केले. यासाठी कॅप्टन चौहान यांनी कठीण प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सियाचिन ग्लेशियरवर असलेल्या या प्रत्यक्ष पोस्टवर लष्करी महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आजवर महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या नियमित सेवाकार्याचा भाग म्हणून सियाचिन बेस कॅम्पवर तैनात करण्यात येत होते. जे सुमारे नऊ हजार फुटांवर आहे.
भारतीय नौदल आणि हवाईदलाने त्यांच्या सेवेत महिलांसाठी इतर सर्व शाखांसह लढाऊ शाखा ही खुली केले असली तरी, सैन्यदलाद्वारे त्यांच्या लढाऊ शाखेत अर्थात पायदळात महिला अधिकाऱ्यांचा अद्याप समावेश झालेला नाही.
कॅप्टन शिवा चौहान या मूळ राजस्थानच्या असून बंगाल सॅपरच्या अधिकारी आहेत. कॅप्टन चौहान यांचे शालेय शिक्षण उदयपूर येथून झाले असून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली आहे. २०२१ मध्ये त्यांची सैन्यदलाच्या इंजिनिअर रेजिमेंटमध्ये अधिकारी म्हणून नियुक्त झाली. सियाचिनमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कॅप्टन चौहान देशसेवा बजावणार आहेत. कुमार पोस्ट हे ‘नॉर्दर्न ग्लेशियर बटालियन’चे मुख्यालय असून येथे तैनात असलेल्या या महिला अधिकाऱ्यासाठी शौचालय, राहण्यासाठीची सुविधा स्वतंत्रपणे देण्यात येणार आहेत.
जाणून घ्या कुमार पोस्ट बाबत ः
- अत्यंत बर्फाळ भागात आहे कुमार पोस्ट
- कुमार पोस्टच्या मार्गावर चार कॅम्प
- जगातील सर्वात उंच युद्धभूमी
- नेहमी उणे तापमान, ऑक्सिजनची कमतरता
PNE23T16014