
सोळा लाखांचे चरस जप्त, दोघांना अटक
पुणे : चरस या अमली पदार्थाची विक्री करण्यास आलेल्या परराज्यातील दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून १६ लाख रुपये किमतीचे एक किलो ८८ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई सोमवारी (ता. २) ताडीवाला रोड येथे करण्यात आली. अमीर मसिउल्ला खान (वय २४, रा. ताडीवाला रोड, मूळ रा. गंज दुडवारा, जि. कासगंज, उत्तर प्रदेश), अतुल गौतम वानखेडे (वय २२, रा. ताडीवाला रोड, मूळ रा. तथागत नगर, ता. खामगाव) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल
पुणे : हॉटेलच्या व्यवस्थापकाने सहकारी महिलेला केबिनमध्ये बोलावून शरीरसंबंधाची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तरुणीने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल पांडुरंग सानप (वय ३२, रा. बी.टी. कवडे रोड) आणि विनोद पवार (वय ३८, रा. केशवनगर, मुंढवा) अशी संशयितांची नावे आहेत. हा प्रकार मुंढवा रस्त्यावरील एका तारांकित हॉटेलमध्ये सप्टेंबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या हॉटेलमध्ये नोकरीस आहेत. तर, राहुल सानप हा व्यवस्थापक आहे. राहुल याने आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन तरुणीला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. तेथे तिचा विनयभंग केला. तसेच, याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
लोखंडी प्लेटा चोरणाऱ्यांना अटक
पुणे : इमारतीच्या बांधकामास लागणाऱ्या लोखंडी प्लेटा चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली. तर, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपये किमतीच्या दीडशे लोखंडी प्लेटा जप्त केल्या आहेत. दत्ता धनाजी पाटोळे (वय १९, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) आणि साहिल दत्ता ढावरे (वय १९) अशी संशयितांची नावे आहेत. कात्रज परिसरात इमारतीच्या बांधकामाच्या लोखंडी प्लेटा चोरीस जात होत्या. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिस ठाणे अंमलदार मितेश चोरमले, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड यांना अल्पवयीन मुले काही साथीदारांच्या मदतीने चोरी करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपींची नावे समजली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला.
तरुणांकडून पोलिसांना धक्काबुक्की
पुणे : सार्वजनिक ठिकाणी गाणे लावण्यावरून झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना काही तरुणांनी धक्काबुक्की केली. भांडण सोडविताना पोलिसांनी ध्वनिवर्धक बंद केल्यामुळे खडकी येथे सोमवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. सुमीत सुभाष मिश्रा, रसल अॅल्वीस जॉर्ज, वृषभ अशोक पिल्ले, निशांत संजय गायकवाड, सिद्धार्थ महादेव लोहान अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. आरोपींनी पोलिसांना अपशब्द वापरून गाडीची चावी काढून घेतली, अशी फिर्याद पोलिस उपनिरीक्षक अर्जन बेंदगुडे यांनी दिली आहे.
--------