पुण्याच्या काही भागाला फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्याच्या काही भागाला फटका
पुण्याच्या काही भागाला फटका

पुण्याच्या काही भागाला फटका

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ४ : महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीने मंगळवारी मध्यरा‍त्रीनंतर पुकारलेल्या संपाचा परिणाम पुणे शहराच्या काही भागाच्या वीज पुरवठ्यावर झाला. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा उभी केली असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला असला तरी सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, पाषण, म्हाळुंगेसह काही भागाचा वीजपुरवठा रात्रीपासून बंद होता. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील घरून काम करणारे कर्मचारी, छोटे उद्योग आणि जवळपास एक ते दीड लाख नागरीकांना त्याचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
संपात दिवसा कामावर असलेले पुणे परिमंडलातील ९२ टक्के कर्मचारी, अभियंता व अधिकारी सहभागी झाले होते. परंतु पाणी पुरवठा योजना, मोठी रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात महावितरणला यश आले.

दहा ते बारा तास खंडित
या संप कालावधीत पुणे शहरामध्ये प्रामुख्याने सिंहगड रोड, वडगाव, हिंगणे, धायरी या परिसराला सर्वाधिक फटका बसला. सिंहगड रस्त्याच्या काही भागात बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे दहा ते बारा तास विजेअभावी राहावे लागले. अभिरुची, लिमयेनगर, प्रयागा हे तीन उपकेंद्रांत एकापाठोपाठ बिघाड झाल्याने हा वीजपुरवठा बंद पडला. त्यात कर्मचाऱ्यांचा संप असल्याने दुरुस्तीच्या कामाला वेळ लागला. परिणामी त्यामुळे सुमारे ३० हजारांहून अधिक वीजग्राहकांची मोठी गैरसोय झाली.

कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत
गंभीर बिघाड लक्षात आल्यानंतर कार्यकारी अभियंता मनीष सूर्यवंशी व केशव काळूमाळी यांनी कंत्राटदार एजन्सीच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बिघाड शोधणे व दुरुस्ती कामाला सुरवात केली. तर महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत यांनी भेट देऊन दुरुस्ती कामांची पाहणी केली. त्यानंतर बुधवारी सायंकाळी उशिरा या सर्व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाला.

दुरुस्ती कामे जोरात
शिवणेमधील उत्तमनगर, वाकड व सांगवीमधील काही परिसर, सुस रोड, म्हाळुंगे, पाषाण, धनकवडी, आंबेगाव, कात्रज, गोकुळनगर, भिलारेवाडी, रामटेकडी, हडपसर गाडीतळ, बीटी कवडे रोड, टिंगरेनगर, मोहननगर, प्रेस कॉलनी, कोथरूडमधील शास्त्रीनगर आदी परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. यातील बहुतांश भागात वीजपुरवठा सुरळीत झाला असून उर्वरित ३० टक्के भागांमध्ये दुरुस्ती कामांद्वारे रात्री सात वाजेपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला, असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

उद्योगांनाही फटका
चाकण एमआयडीसीमधील पाच वीजवाहिन्या तसेच तळेगाव शहर, इंदोरी, वडगाव, सोमाटणे, नाणेकरवाडी, कुरळी, कडूस गावांना वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला होता. दुरुस्ती कामे करून दुपारपर्यंत या भागाचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. तसेच जुन्नर, ओतूर गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. तो देखील सायंकाळपर्यंत टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला. भोसरी एमआयडीसी सेक्टर सात तसेच कुदळवाडी, देहू गाव, बोऱ्हाडेवाडी, चिखली तसेच निगडीमधील ओटा स्कीम परिसरातील वीजपुरवठा विविध बिघाडांमुळे खंडित झाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत या परिसरात वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

पहाटेपासून वीज नाही. आमच्या एक सभासदाने तक्रार नोंदविली आहे. अपार्टमेंटला पाणी पुरवठा करणारे पंप सुरू करण्यात समस्या येईल. संपर्कासाठी दिलेल्या १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या नंबरवर संपर्क साधायचा प्रयत्न केला. पण शेवटपर्यंत फोन लागला नाही.
- सुरेश गोरे, ज्येष्ठ नागरिक, कोथरूड

महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपाला आमचा पाठिंबा आहे पण त्यासाठी सर्वसामान्य माणसांना वेठीस धरू नये. वीज खंडित झाल्यावर दुरुस्तीसाठी कामगार उपलब्ध नाहीत. त्यामुळे जनतेचे हाल होऊ शकतात. काही भागात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा सुरू झाला. पण परत लगेच वीज गेली.
- विनोद पवार, विश्रांतवाडी

रात्रीपासूनच वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर कोणीही दुरुस्तीस आले नाही. दुरुस्तीसाठी वारंवार महावितरणला कळून देखील त्यांच्याकडून कोणी आले नाही. त्यामुळे पाणी नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली. अशा काळासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
- उज्ज्वला पाटील, सिंहगड रस्ता