पुणे महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ!
पुणे महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ!

पुणे महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ!

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : ‘जी २०’ परिषदेच्या पहिल्या बैठकीसाठी अवघे १० दिवस शिल्लक असताना एकमेव व्हीआयपी मार्गाची दुरुस्ती, सुशोभीकरण करवून घेताना प्रशासनाला नाकीनऊ आले आहे. आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त वारंवार कामाची पाहणी करत असले तरी विविध विभागांमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे आता आयुक्तांनी प्रत्येक विभाग प्रमुखाला ठराविक टप्पे विभागून दिले असून, त्यांनी या टप्प्यातील पथ, विद्युत, स्वच्छता, रंगरंगोटी ही सर्व कामे १० जानेवारीपर्यंत पूर्ण करून घ्या अन्यथा कारवाई केली जाईल अशी तंबी दिली आहे.
पुण्यात ‘जी २०’ परिषद होणार असल्याने त्यासाठी ३७ देशांचे सुमारे १५० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यातील बहुतांश प्रतिनिधी हे लोहगाव विमानतळावर उतरल्यानंतर सेनापती बापट रस्त्यावरील पंचतारांकित हॉटेलमध्ये परिषदेसाठी उपस्थित असतील. त्यांची तेथेच निवास व्यवस्था असणार आहे.

अशी आहे स्थिती
- लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्त्याला व्हीआयपी दर्जा
- रस्त्याची दुरुस्ती, भितींची रंगरंगोटी, डांबरीकरण, राडारोडा उचलणे, दुभाजक स्वच्छ करणे, त्याला रंग लावणे ही कामे सुरू
- जी २०चे ब्रँडिंग करण्यासाठी स्टिकर लावणे, पादचारी मार्ग दुरुस्ती करणे, विद्युत खांबांना रंग लावणे, त्यांची दुरुस्ती करणे यासह अनेक कामे हाती
- कामे पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडून वारंवार आदेश
- महापालिकेत आढावा बैठकाही झाल्या
- गेल्या आठवड्यात केंद्र सरकारच्या एका पथकाकडून संपूर्ण रस्त्याची पाहणी
- त्यावेळी अनेक त्रुटी आढळून आल्याने कामे वेगात करा असे पुन्हा आदेश
- तरीही महापालिकेची यंत्रणा हललेली नाही

‘१० जानेवारीपर्यंत काम पूर्ण करा’
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी विमानतळ ते सेनापती बापट रस्त्याची रात्रीच्या वेळी पाहणी केली, त्यानंतर दिवसाही त्यांनी कामे पाहिली. पण त्यामध्ये विद्युत विभाग, पथ विभाग, घनकचरा विभाग, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये समन्वय नसल्याने संथ गतीने काम सुरू आहे. छोटी कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे ही कामे लवकर संपण्याची शक्यता नाही. हे लक्षात आल्याने आता १२ विभागप्रमुखांमध्ये या ११ किलोमीटरच्या रस्त्याची विभागणी करून १० जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश  दिले आहेत. त्याबाबत लेखी आदेश काढले आहेत, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

ही कामे आहेत प्रलंबीत
- पथदिवे दुरुस्ती, रंग देणे
- भिंतीची रंगरंगोटी, रस्ता दुभाजक स्वच्छ करणे, चौकांचे सुशोभीकरण
- मेट्रोने बॅरिकेटींगवर जी २०ची जाहिरात करणे
- ब्रँडिंगसाठी स्टिकर लावणे
- राडारोडा, कचरा उचलून टाकणे

‘जी २०’च्या निमित्ताने महापालिका राज्यातील तसेच शेजारच्या राज्यातील महापालिका आयुक्तांची परिषद देऊन शहराच्या विकासावर चर्चा करणार आहे. त्यात पुणे महापालिकेचे काम हे सांगितले जाईलच, पण इतर महापालिकाकडून त्यांच्या चांगल्या संकल्पनांचा विचार केला जाईल. ही परिषद १३ जानेवारी रोजी होईल.
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका पुणे