
गाणाऱ्या व्हायोलिनमधून स्वरांजली
पुणे, ता. ५ : राग चारुकेशीचे आर्त स्वर उमटले. प्रसिद्ध व्हायोलिनवादक पं. भालचंद्र देव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कन्या व शिष्या चारुशीला गोसावी त्यांना स्वरांजली वाहत होत्या. हृदयाला भिडणारी ती करुण स्वरवंदना श्रोत्यांना हेलावून सोडत होती. व्हायोलिन गात होती.
‘स्वरबहार’ व ‘सांस्कृतिक पुणे’ या संस्थांतर्फे आयोजित ‘व्हायोलिन गाते तेव्हा’, हा कार्यक्रम गांजवे चौकातील एस. एम. जोशी सभागृहात झाला. शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, मराठी व हिंदीतील चित्रपटगीतांचा व्हायोलिनवादनातील श्राव्यानुभव निखळ आनंद देत होता. ‘देवाचिये द्वारी’ या भक्तिरचनेने वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली. नंतर कलावती रागातील ‘प्रथम तुज पाहता’, या गीताने बहार आणली. यमन, केदार, सोहनी व मल्हार या रागांतील लघुरूप बंदिशी सादर करून यांवर आधारित जिवलगा कधी रे’, हे गीत चारुशीला यांनी खुलवले. पाठोपाठ राग भिन्न षड्जातील ‘याद पिया की आए’, ही ठुमरी नजाकतीने पेश केली.
यानंतर महाराष्ट्रातील लोकगीतांचा स्पर्श ल्यायलेली मराठी चित्रपटगीतं प्रस्तुत केली. यांतील ‘का हो धरिला मजवरी राग’, ‘ऐन दुपारी’, ‘वादळ वारं सुटलं’, ‘मलमली तारुण्य माझे’, ‘निसर्ग राजा’ यांसारख्या गीतांमधील नखरा सुरेलपणे अवतरला. यानंतर पटदीपवर आधारित ‘बाजे रे मुरलिया’ या रचनेने जिंकून घेतले. ‘ओ सजना’, ‘मधुबन में राधिका’, ‘इन्हीं लोगों ने’, ‘निगाहें मिलाने को’, ‘लागा चुनरी में’ या हिंदी चित्रपटगीतांनंतर भैरवी धून वाजवून चारुशीला यांनी समारोप केला. मोहन पारसनीस (तबला), विनीत तिकोनकर (ढोलकी व तबला), राजेंद्र साळुंके (तालवाद्यं), अमृता दिवेकर (की बोर्ड) व प्रसन्न बाम (हार्मोनिअम) यांनी साथ केली. नीरजा आपटे यांनी निवेदन केले.