‘एनसीसी’च्या प्रजासत्ताक दिन शिबिराचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एनसीसी’च्या प्रजासत्ताक दिन शिबिराचे उद्‍घाटन
‘एनसीसी’च्या प्रजासत्ताक दिन शिबिराचे उद्‍घाटन

‘एनसीसी’च्या प्रजासत्ताक दिन शिबिराचे उद्‍घाटन

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) प्रजासत्ताक दिन शिबिराचे (आरडीसी) उद्‍घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते शनिवारी (ता. ७) पार पडले. या ७४ व्या एनसीसी आरडीसीची सुरुवात झाली असून महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात विविध राज्यातून आलेल्या एनसीसी संचालनालयातील एकूण दोन हजार १५५ कॅडेट्सचा सहभाग आहे.

आरडीसी उद्‍घाटन सोहळ्यात एनसीसीच्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही विंगमधून निवडलेल्या कॅडेट्सच्या तुकडीने संचलन करण्यात आले. या संचलनाची पाहणी उपराष्ट्रपतींनी केली. कार्यक्रमादरम्यान एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी उपराष्ट्रपतींना एनसीसीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्यत्व दिले.
या वेळी धनखड म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांमध्ये एनसीसीने प्रेरणादायी आणि शिस्तबद्ध तरुणांची एक चैतन्यशील आणि वैविध्यपूर्ण केडर तयार केली असून हे तरुण जीवनाच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतकाळात हे कॅडेट्स देशासाठी विशेष कामगिरी करतील.’’ आरडीसीमध्ये सर्व केंद्रशासित प्रदेश व राज्यातून संचालनालयांनी सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर शिबिरात १९ मित्र देशांतील कॅडेट आणि अधिकारीही सहभागी झाले. दरम्यान यासाठी एनसीसीचे महाराष्ट्र संचालनालय पुण्यातून २९ डिसेंबर २०२२ रोजी रवाना झाले होते. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये निवडक कॅडेट्स सहभाग घेत आपापल्या संचालनालयाचे नेतृत्व करतील. तर २८ जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या रॅलीने आरडीसीचा समारोप होईल. या सर्व स्पर्धांच्या माध्यमातून एका संचालनालयाला विजेतेपदाचा मान मिळेल. गेल्या वर्षी महाराष्ट्र संचालनालयाने आरडीसीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता.