
आशिष चांदोरकर यांच्या स्मृतीनिमित्त व्याख्यान
पुणे, ता. ७ : ‘‘बाजाराला शरण गेल्यामुळे सर्वच क्षेत्रात अधःपतन झाले असून राजकारण आणि पत्रकारिता हेही त्याला अपवाद नाहीत,’’ असे मत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी मांडले.
आशिष चांदोरकर कुटुंबीय आणि मित्र परिवारातर्फे पत्रकार आशिष चांदोरकर यांच्या स्मृतीनिमित्त डॉ. सहस्त्रबुद्धे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी महेश गोगटे लिखित ‘दि सॅक्रेड वॉटर्स ऑफ वाराणसी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, ‘‘कार्यकर्त्यांच्या अपेक्षा जशा राजकारणात बदल्या आहेत. तशाच वाचकांच्याही अपेक्षा पत्रकारितेकडून बदलल्या आहेत. बाजाराला शरण गेल्यामुळे सर्वच क्षेत्रात अधःपतन झाले आहे. या सर्व प्रक्रियेचा परिणाम आपल्या अभिमत निर्मिती प्रक्रियेवर झाला आहे. आजच्या माध्यमांमध्ये वृत्त आणि विचार यांची भेसळ झालेली दिसते.’’ या प्रसंगी अर्चना चांदोरकर आणि स्नेही ब्रह्मे आदी मान्यवर उपस्थित होते.