
शहर स्वच्छतेला पुणेकरांचा हातभार
पुणे, ता. ८ ः ‘जी 20’ परिषदेच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना शहराचे अनोखे दर्शन घडावे, यासाठी महापालिका प्रशासनाकडून स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाच्यावतीने नागरिकांच्या सहभागातून रविवारी सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शहरातील १५० हून अधिक ठिकाणी ही मोहीम पार पडली, त्यामध्ये विविध स्वयंसेवी संस्था, नागरीकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
शहरामध्ये आगामी आठवड्यात ‘जी 20’ परिषद होणार आहे. त्यामध्ये विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर स्वच्छ व सुंदर शहर असा शहराचा संदेश जगभर पोचावा, यादृष्टीने महापालिका प्रशासनाने स्वच्छतेवर भर दिला आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे स्वच्छता मोहिमेचे रविवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत आयोजन केले होते. या मोहिमेचे उद्घाटन शनिवार वाड्याच्या प्रांगणात झाले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व अन्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, विविध स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना विकास ढाकणे म्हणाले की, जी 20 परिषदेला पुण्यात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना पुणे शहराचे अनोखे दर्शन घडवण्यासाठी आपण सारे कटिबद्ध आहोत. त्यादृष्टीने शहर अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे.’’ यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथही देण्यात आली.
दृष्टिक्षेपात मोहीम
- सहभागी नागरिक, विद्यार्थी, तरुणांनी शनिवारवाडा प्रांगण आणि अंतर्गत भागामध्ये सफाई मोहीम राबवली
- शहराच्या विविध भागातील महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील १५० हून अधिक ठिकाणी ही स्वच्छता मोहीम
- प्रमुख ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांबरोबरच पर्यटन स्थळे, सार्वजनिक उद्याने, प्रमुख चौकांचा समावेश
- विविध स्वयंसेवी संस्था आणि संघटनांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग