
आयसीयूमध्ये उपचारादरम्यान रुग्ण भाजला
पुणे, ता. १० : अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार घेत असलेला रुग्ण गरम पिशवीतील पाणी लिकेज होऊन गंभीररीत्या भाजल्याची घटना कोरेगाव पार्क येथील इनलॅक्स ॲड बुधराणी हॉस्पिटलमध्ये घडली. हिरालाल सारवान (वय ७०, रा. गजानन सोसायटी, दौंड) असे जखमी रुग्णाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा अॅड. सुरेश सारवान यांनी नऊ जानेवारी रोजी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून हॉस्पिटलमधील एका डॉक्टरसह नर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरालाल सारवान हे रेल्वे खात्यात जमादार पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. ४ जानेवारी रोजी त्यांचा रस्ते अपघात झाला. त्यामुळे उपचार घेण्यासाठी ते दौंड रेल्वे रुग्णालयात दाखल झाले. सिटी स्कॅनमध्ये त्यांच्या डोक्यात रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाल्याने त्यांना इनलॅक्स ॲण्ड बुधराणी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून उपचारासाठी त्यांना आयसीयूमध्ये ठेवले होते. त्या रात्री त्यांचे कुटुंब मुक्कामासाठी नातेवाइकांकडे गेले. दुसऱ्या दिवशी फिर्यादी आईसमवेत वडिलांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेल्यावर त्यांना वडील बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांच्या पोटावर, हातावर आणि गुप्तांगावर भाजल्याच्या खुणा होत्या. याबाबत त्यांनी डॉ. महेश कुमार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी गरम पाण्याची पिशवी लिकेज झाल्याने रुग्णाला भाजल्याचे सांगितले. यानंतर फिर्यादी व त्यांच्या सहकारी वकिलांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात जाऊन घडला प्रकार सांगत डॉक्टर आणि नर्सविरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला.