
सीबीएसई मान्यतेचे बनावट प्रमाणपत्र घेणाऱ्या शाळांवर गुन्हे
पुणे, ता. १० : शाळांना सी. बी. एस. ई. बोर्डाशी संलग्नता असलेल्या अभ्यासक्रमाची मान्यता दिल्याचे बनावट ना-हरकत प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुनंदा तुकाराम वाखारे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून समर्थ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मागील १४ जुलै २०२२ पूर्वी अज्ञात व्यक्तीने माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या क्रिएटिव्ह एज्युकेशनल सोसायटी, पुणे संचलित पब्लिक स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, एम. पी. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, बी. एम. सी. सी. रोड, शिवाजीनगर आणि एज्युकेशनल करिअर फाउंडेशन नमो आर. आय. एम. एस. इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, जि. पुणे या शाळा-ज्युनिअर कॉलेजला सी. बी. एस. ई. बोर्डाशी संलग्न करण्याबाबत बनावट ना-हरकत प्रमाणपत्र बनविले आहेत, असे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यावरून समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून हे प्रमाणपत्र शाळांना १२ लाख रुपयांना विकल्याचा संशय आहे. काही अज्ञात व्यक्तींनी दुसऱ्याच शाळेचा इनवर्ड क्रमांक टाकून पुण्यातील संस्थाचालकांना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.