
माजी सैनिकांसाठी रॅली
पुणे, ता. १० ः लष्कराच्या स्टेशन मुख्यालय खडकी-औंधच्या परिसरात राहणाऱ्या माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांच्यासाठी माजी सैनिकांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली येत्या शनिवारी (ता. १४) बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर (खडकी) येथील पॅव्हेलियन येथे होणार आहे. रॅलीचे उद्दिष्ट माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांबरोबर वीरमाता, वीरपत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरच्या योजनांची माहिती प्रदान करणे तसेच त्यांच्या तक्रारींचे निवारण करणे हा आहे. त्याचबरोबर विविध अभिलेख कार्यालयांचे, संरक्षण लेखा प्रमुख नियंत्रक (निवृत्तिवेतन), राज्य सरकारच्या संस्था व बँक या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने दस्तऐवजीकरणातील विसंगती दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना विभागाच्या (ईसीएचएस) समन्वयाने खडकी लष्करी रुग्णालयात वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.